५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मडगाव, गोवा येथील कु. आर्या दिगंबर जामदार (वय ७ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आर्या जामदार ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. गर्भारपण
१ अ. गर्भारपणी स्वप्ने पडून स्वप्नात देवीचे दर्शन होणे : ‘गर्भारपणी मी शिवलीलामृत, श्रीमद्भगवद्गीता, हरिपाठ आदी धार्मिक ग्रंथांचे वाचन करत असे. त्या वेळी मला सतत देवतांची स्वप्ने पडत. मी प्रतिदिन नामजपही करायचे.
१ आ. प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करणे आणि भजने ऐकणे : माझ्याकडे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे झोपाळ्यावर बसलेले एक छायाचित्र आहे. त्याकडे मी प्रतिदिन पहात असे आणि ‘माझे बाळही प.पू. बाबांसारखे तेजस्वी व्हावे’, अशी प्रार्थना करत असे. मी सतत त्यांची भजने आणि श्रीरामाचा पाळणा ऐकत असे. त्या वेळी बाळाची हालचाल वेगाने होत असे.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन बाळासाठी प्रार्थना होणे : एकदा आम्ही सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेलो होतो. तेथे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तेव्हा ‘गुरुदेवांचे चैतन्य बाळाला मिळावे आणि माझे बाळ असेच तेजस्वी व्हावे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती.
२. प्रसुती – अकस्मात् पुष्कळ त्रास होऊ लागणे; मात्र पूर्ण श्रद्धेने प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्याने प्रसुती सुलभ होऊन बाळ सुखरूप जन्माला येणे
प्रसुतीसाठी मी गावी गेले असता मला अकस्मात् पुष्कळ त्रास होऊ लागला. तेव्हा आधुनिक वैद्यांनी माझा रक्तदाब वाढला असल्याने तातडीने रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. तेव्हा माझ्याकडून सतत परम पूज्य गुरुदेवांना प्रार्थना होत होत्या. ‘ते मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहेत आणि बाळाची काळजीही घेणार आहेत’, अशी माझी श्रद्धा होती. माझी प्रसुती अवघड होती; पण गुरुदेवांच्या कृपेने ती अगदी सहज झाली आणि बाळही सुखरूप होते.
३. जन्मानंतर – बाळ पुष्कळ तेजस्वी दिसत होते.
३ अ. जन्म ते १ मास – चि. आर्या रात्री न झोपता कधी रडत असेल, तेव्हा मी भ्रमणभाषवर रामाचा पाळणा किंवा नामजप लावून ठेवायचे. त्यानंतर ती शांत होऊन तो ऐकत असे.
३ आ. वय – १ ते ४ वर्षे
३ आ १. देवपूजा करण्याची आवड : मी देवपूजा करत असले की, आर्यालाही पूजा करावीशी वाटे. देवाला फुले अर्पण करणे आणि गंध लावणे, हे सर्व ती पुष्कळ आवडीने करायची.
३ आ २. उत्तम निरीक्षणक्षमता : आर्या प्रत्येक गोष्टीचे अगदी बारकाईने निरीक्षण करते आणि त्याप्रमाणे कृती करते. तिची स्मरणशक्तीही पुष्कळ चांगली आहे. एकदा तिने शाळेत ‘राधे’ची वेशभूषा केली होती. ती करतांना ‘राधा कशी असते ? तिने काय परिधान केले होते ?’ हे सर्व तिला ठाऊक होते.
३ इ. वय – ४ ते ७ वर्षे
३ इ १. धर्माचरणाची आवड : आर्याला लहानपणापासून सात्त्विक कपडे घालायला आवडतात. शाळेत जातांना ती हातात बांगड्या घालते आणि कपाळाला टिकलीही लावते.
३ इ २. शांत आणि समजूतदार स्वभाव
अ. आर्या कुठल्याच गोष्टीसाठी कधी हट्ट करत नाही. जेवणातसुद्धा तिच्या काही आवडी-निवडी नाहीत. मी जे काही देईन, ते ती आवडीने खाते.
आ. अगदी लहान असल्यापासून आर्याला ‘मी सत्संग घेत असतांना गोंधळ करायचा नाही’, हे समजायचे. सत्संग चालू असतांना मनाविरुद्ध काही झाले, तरी ती हळू आवाजात रडायची.
इ. आर्या नेहमी शांतपणे बोलते. एकदा मी आणि माझे यजमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शिबिरासाठी गेलो होतो. तेव्हा तेथे आर्याशी खेळायला कुणी लहान मूल नव्हते, तरी तिने तिन्ही दिवस आम्हा दोघांना कोणताही त्रास दिला नाही.त्यामुळे आम्हाला शिबिराचा लाभ घेता आला.
४. सद्गुरु स्वाती खाडये यांनी केलेले कौतुक !
एकदा आर्याला बघून सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘तुमची मुलगी पुष्कळ गोड आहे.’’
‘हे गुरुमाऊली, मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘आर्याकडून साधना करून घ्यावी आणि तिला आपल्या चरणांजवळ ठेवावे’, अशी प्रार्थना करते.’
– सौ. रोहिणी दिगंबर जामदार (कु. आर्याची आई), मडगाव, गोवा. (२१.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |