अकोला येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती
१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी आध्यात्मिक त्रास आणि जडत्व जाणवणे अन् त्यासाठी संतांनी सांगितल्यानुसार नामजपाचे उपाय करणे
‘अकोला येथील ‘जुने शहर’ या विभागातील संवेदनशील भागात रहाणार्या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांकडून मागणी आल्यानुसार १२.३.२०२३ या दिवशी एका छोट्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन ‘श्री विठ्ठल मंदिर सभागृहा’त करण्यात आले होते. एकंदरीतच सभास्थळाचे अवलोकन केले असता, आध्यात्मिक त्रास आणि जडत्व जाणवत होते. त्यासंदर्भात आणखी निरीक्षण करण्यासाठी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर वेळ काढून अमरावती येथून आले होते. त्यांनी आध्यत्मिक स्तरावरील उपाय म्हणून ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांना ‘निर्गुण’ हा जप प्रतिदिन २ घंटे करायला सांगितला.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर होणे
प्रत्यक्ष सभेच्या दिवशी सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मी घरी बसून नामजप करत होतो. तेव्हा मला सूक्ष्मातून व्यासपीठ आणि त्याच्या सभोवतीची ५ फूट व्यासाची जागा येथे प्रचंड मोठी काळी छाया (अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण) दिसत होती. ‘या स्थितीत काय करावे ?’, हे मला सुचत नव्हते. तेव्हा देवाने माझ्याकडून सूक्ष्म स्तरावर पुढील कृती करून घेतल्या.
अ. मला एकदम सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांची आठवण झाली. मी त्यांना प्रार्थना केली आणि भ्रमणभाष करून ‘काय करावे ?’, हे विचारून घेतले.
आ. ‘सद्गुरु गाडगीळकाका यांनी व्यासपिठाचे छायाचित्र काढून पाठवण्यास सांगितले. तेव्हा एका साधकाने तेथील छायाचित्र काढून पाठवल्यावर ‘त्या काळ्या छायेसमवेत वक्त्यांच्या आसंदीखाली २ काळ्या आकृृत्या दडून बसल्या आहेत’, असे मला जाणवत होते.
इ. ‘सद्गुरु गाडगीळकाका यांनी रामनाथी आश्रमातूनच संपूर्ण व्यासपिठाभोवती मंडल घातले. त्यांनी इतर नामजपादी उपाय केले. त्या वेळी काळी छाया नष्ट झालेली मला दिसली; परंतु ‘आसंदीखाली दडून बसलेल्या २ आकृत्या तशाच होत्या’, असे मला सूक्ष्मातून जाणवत होते.
ई. मी परत सद्गुरु गाडगीळकाका यांना प्रार्थना केली आणि वस्तूस्थिती सांगितली. त्यांनी सांगितले, ‘‘शंखनाद झाल्यावर ५ मिनिटांनी त्या जातील.’’ (प्रत्यक्षातही शंखनाद करणारा साधक ५ मिनिटे उशिरा पोचला होता.) ‘शंखनाद झाल्यावर मांजराची पिल्ले जशी हळूच काढता पाय घेतात, तशा पद्धतीने त्या काळ्या आकृृत्या निघून गेल्या’, असे मला सूक्ष्मातून जाणवले.
३. आध्यात्मिक उपायांमुळे सभा निर्विघ्नपणे पार पडणे
सभेमध्ये ‘रणरागिणी’ या विषयावर मार्गदर्शन चालू होताच सभेच्या ठिकाणचे वातावरण एकदम पालटले. सर्वत्र चैतन्य पसरले. इतक्या संवेदनशील भागातही केवळ गुरुमाऊलींचे चैतन्य, पू. पात्रीकरकाका यांचा संकल्प आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी रामनाथी आश्रमातून सूक्ष्मातून केलेले उपाय, यांमुळे सभा निर्विघ्नपणे पार पडली.
मला सभेच्या निमित्ताने मिळालेल्या समष्टी नामजपाच्या सेवेमुळे घरी बसून सर्व काही गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच अनुभवता आले. ‘सनातनचे सद्गुरु आणि संत यांची निर्गुण स्तरावरील साधना किती उच्च पातळीची आणि परिणामकारक असते !’, हे मला शिकायला मिळाले. यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. श्याम राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७७ वर्षे), अकोला. (१५.३.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |