फाशीच्या शिक्षेतून कतारमधील भारतियांना वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न !
‘काही वर्षांपासून भारताचे माजी नौदल अधिकारी हे कतारच्या करागृहात आहेत. त्यांना अलीकडेच कतारने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना वाचवण्यासाठी भारत सरकारकडून कशा प्रकारे प्रयत्न होत आहेत आणि त्यात भारताला कितपत यश मिळाले आहे, हे या लेखात पाहूया.
१. कतारमधील माजी भारतीय नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा
‘कतारने माजी भारतीय नौदलाच्या अधिकार्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ते एका खासगी आस्थापनासाठी काम करत होते. हे आस्थापन इस्रायलचे असल्याचे समजले जात होते. ‘त्यांनी इस्रायलसाठी काही गुप्तहेरी केली’, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर कतारच्या न्यायालयात खटला भरण्यात आला आहे. त्यांना वाचवण्यासाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे. त्यात सध्यातरी यश मिळत असल्याचे दिसत आहे.
२. भारतीय अधिकार्यांना वाचवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न !
२ अ. सर्वप्रथम भारत आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियम यांच्या साहाय्याने कतारला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, त्यांची नि:पक्ष चौकशी (‘फेअर ट्रायल’) घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची नि:पक्ष चौकशी व्हावी. त्यात त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी जो पुरावा वापरण्यात आला होता, तो सर्वांसमोर मांडण्यात यावा. दुसरीकडे भारत मुत्सद्देगिरीचा वापर करून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, भारत हा एक मोठा देश आहे आणि भारतीय नागरिकांना पुरेशी संधी न देता जर तुम्ही त्यांना शिक्षा केली, तर भारत आणि कतार यांच्यातील संबंध बिघडतील.
२ आ. भारताकडून मुत्सद्देगिरीचा वापर : लक्षात ठेवा, याची मोठी किंमत कतारला द्यावी लागेल ! त्यांच्याकडून भारत मोठ्या प्रमाणात गॅस खरेदी करतो. आज लक्षावधी भारतीय कतारला मोठे करण्यासाठी साहाय्य करत आहेत. कतारला आर्थिकदृष्ट्या भारताची आवश्यकता आहे. त्यांचा गॅस कुणी खरेदी केला नाही आणि त्यांना कामासाठी पुरेसे कुशल अन् अकुशल लोक न मिळाले नाहीत, तर यात कतारचीच हानी आहे. अशा पद्धतीने मुत्सद्देगिरीचा वापर करून भारत दबाव निर्माण करत आहे.
२ इ. आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न : अशा प्रकारे जे निर्णय दिले जातात, विशेषत: दुसर्या देशांच्या नागरिकांसाठी, ते अतिशय पारदर्शक असावेत, त्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले जाऊ नये, तसेच बंदिस्त भारतियांना समुपदेशन घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ‘जिनेव्हा करारा’च्या अंतर्गत आवश्यक त्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी भारताचा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारे भारत विविध प्रकारे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्यातरी यात भारताला यश मिळत आहे.
३. भविष्यातील भारताचे प्रयत्न
भारतीय नागरिकांना फाशीची शिक्षा मिळाल्यासंदर्भात परत सुनावणी चालू करण्यात यावी. याविषयी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुरावे सादर केले जावेत, तसेच त्यांना दिलेली फाशीची शिक्षा रहित करून अन्य काही शिक्षा दिली जावी किंवा भारतीय कारागृहात शिक्षा दिली जावी, यासाठी भारत प्रयत्न करत आहे. मला निश्चिती आहे की, आज भारत मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे काही भारतियांना शिक्षा देऊन भारताशी शत्रुत्व घेण्याचा प्रयत्न कतार करणार नाही. येणार्या काळात या निवृत्त नौदल सैनिकांना वाचवण्यात भारताला निश्चितच यश मिळेल.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.