ब्राह्मणांची लक्षणे कोणती ?
ब्राह्मण हा अकिंचन व्रत पत्करतो. स्वार्थहीन मूल्योपासना पत्करतो. अखंड सहस्रश: वर्षे अखंड हे व्रत त्याने सांभाळले. सुख आणि भोग यांचा मार्ग इतरांकरता मोकळा ठेवला. विद्या हीच ब्राह्मणांची सत्ता. विद्या हेच त्याचे वैभव ! अपरिग्रह, ज्ञान, तप, निष्ठा, विशुद्ध चारित्र्य आणि निष्काम मूल्योपासना ही ब्राह्मणांची लक्षणे आहेत. जितेंद्रिय, शम, दम, तितिक्षा, सत्य आणि शांती सांभाळणारा सद्गुणांचा ओतीव पुतळा अशा या ब्राह्मणांचे आयुष्यच सनातन धर्म अन् संस्कृतीची मूल्ये सांभाळण्याकरता आहे. प्रत्यक्ष आचारातून ती अभिव्यक्त करण्याकरता आहे.
ब्राह्मणाने सतत वेदाध्ययन करावे. अग्निहोत्री गृहस्थ ब्राह्मणाने एक वर्ष पुरेल इतकाच धान्य आणि धन संचय करावा, अर्थात् तो कनिष्ठ ब्राह्मण. जो केवळ एकाच दिवसापुरता, गरजेपुरताच धान्य आणि धन संचय करतो तो श्रेष्ठ ! या कर्तव्यात जर रतिमात्र खंड पडला, तरी त्याचे ब्राह्मण्य त्या मानाने लुप्त होते.
ब्राह्मणाचा वंश शुद्ध रहावा, याकडे स्मृतिकारांचे विशेष लक्ष आहे; कारण त्यांना वेदाध्ययन आणि यज्ञयागादि पवित्र कार्य चालवायची असतात. ‘ब्राह्मणाचाच वंश कशाला, तर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णही शुद्ध रहावे’, अशीच स्मृतिकारांची ओढ आहे; म्हणून तर आंतरजातीय विवाह आणि प्रत्येक वर्णाचे व्यवहार, तसेच कर्तव्ये यांवर बंधने आहेत; म्हणून आंतरवर्ण अन् आंतरजातीय विवाहाचा निषेध आहे.
विद्यादान, संरक्षण, व्यापार अशा भिन्न भिन्न कामांकरता निरनिराळे गुण हवे असतात. ते भिन्न मानव समूहात आढळतात. ते आनुवंशिक असतात. भिन्न वर्गातील स्त्री पुरुषांच्या संततीत ते आढळत नाहीत. सवर्ण संततीच्या अपत्यांतच ते गुण प्रकर्षाने टिकून रहातात.
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, नगर
(साभार : फेसबुक)