रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘साधना शिबिरा’ला उत्साहात प्रारंभ !
रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात ३ दिवसांच्या साधना शिबिराला १ डिसेंबर या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. शिबिराचे उद्घाटन मुंबईतील ‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. उदय अवसरे, मुंबईतील सप्तश्रृंगी मंदिराचे विश्वस्त श्री. राम पाटील आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. वैभव आफळे यांच्या हस्ते करण्यात आले. जिज्ञासूंना अध्यात्मातील विविध तत्त्वांची ओळख करून देणे, तसेच काळानुसार योग्य साधनेविषयी मार्गदर्शन करणे, या उद्देशांनी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागेश गाडे आणि श्री. वैभव आफळे यांनी मार्गदर्शन केले. यासमवेतच दोघांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरही उपस्थित शिबिरार्थींचे मार्गदर्शन केले. या शिबिराला महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा येथील जिज्ञासू उपस्थित आहेत. हे शिबीर १ ते ३ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.