‘जायकवाडी’ धरणासाठी सोडलेले पाणी नाशिककरांनी रोखले !
नाशिक – जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरण समुहातून पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले ४०० दशलक्ष घनफूट पाणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रोखले आहे. त्यांनी या प्रकरणी पाण्याचे फेर नियोजन करण्याचा आग्रह धरला आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील गंगापूर, दारणा, प्रवरा आणि मुळा धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी एकूण ८.६०३ टी.एम्.सी. पाणी सोडण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकानी ३० ऑक्टोबर या दिवशी दिले होते. या आदेशाचे फेरनियोजन करून नव्याने आदेश दिल्यामुळे जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलेले ४०० दशलक्ष घनफूट पाणी रोखण्यात आले. कार्यकारी संचालक, गोदावरी खोरे विकास महामंडळ यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.