व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या माध्यमातून साधकांना चुकांच्या मुळाशी नेऊन अंतर्मुख होण्यास शिकवणार्‍या सौ. सुप्रिया माथूर !

सौ. सुप्रिया माथूर

‘एका साधकाने व्यष्टी साधनेच्या आढाव्यात (टीप) एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, ‘‘सेवा करतांना माझ्या हातून थोडा गूळ खाली पडला. हे दुसर्‍या साधकाने पाहिले आणि तो मला म्हणाला, ‘‘अरे, तुझ्या हातून गूळ खाली पडला आहे.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘हो. मला ठाऊक आहे. मी गूळ उचलणार आहे.’’

या प्रसंगाविषयी सौ. सुप्रिया माथूर यांनी मार्गदर्शन केले. प्रसंग सांगणार्‍या साधकाला त्या म्हणाल्या, ‘‘प्रसंग आणि परिस्थिती आपल्याला आपल्या साधनेचा टप्पा दाखवते. त्या प्रसंगातून शिकून साधकांनी पुढच्या टप्प्याला जायला हवे. घडलेल्या प्रसंगातून तुमच्या मनाची स्थिती लक्षात येते.

कु. संध्या माळी

१. साधकाने तुम्हाला तुमची चूक दाखवली. तेव्हा तुम्हाला न्यूनपणा वाटला आणि तुमचा अहं दुखावला गेला. त्यामुळे तुम्ही उद्धटपणे बोललात.

२. तुमच्याकडून गूळ खाली पडल्यावर तुम्ही ‘हो. मला ठाऊक आहे’, असे उद्धटपणे उत्तर दिले.

३. तुमच्या मनात ‘मी घाईत होतो. त्यामुळे गूळ खाली पडला. मी तो उचलणारच आहे’, असा विचार होता.

४. येथे ‘स्वतःला कळते’, असे वाटणे’, हा तुमच्यातील अहंचा पैलू लक्षात येतो. आपण स्वतःला श्रेष्ठ समजत असतो; म्हणून आपल्याकडून असे बोलणे होते.

५. या प्रसंगात तुम्हाला ‘आपल्याकडून चूक झाली’, याची जाणीव अल्प होती; म्हणून तुमच्याकडून उद्धटपणे उत्तर दिले गेले. चूक झाल्याची जाणीव असती, तर तुम्हाला खंत वाटली असती. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या बोलण्यात नम्रता दिसली असती.

६. ‘मी योग्य पद्धतीने बोलीन’, असा विचार करण्यापेक्षा ‘माझ्याकडून ही चूक माझ्या मनातील कोणत्या विचारांमुळे झाली ?’, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

७. या प्रसंगात तुम्हाला राग आला. ‘राग का आला ?’, याचे कारण शोधल्यास तो न्यून होईल.

८. यात ‘स्वतःला श्रेष्ठ समजणे’, हा अहंचा पैलू आहे. त्याची व्याप्ती काढली पाहिजे.’’

– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)