सतत भावस्थितीत राहून इतरांनाही भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करणार्या श्रीमती मीरा करी !
‘श्रीमती मीरा करीकाकू नेहमी भावस्थितीत असतात. त्या आम्हालाही भावजागृतीची सोपी सूत्रे आणि आध्यात्मिक गोष्टी सांगून ईश्वराच्या मार्गावर चालवतात. त्यांच्यातील भावामुळे त्यांनी सांगितलेली सूत्रे आमच्या अंतर्मनावर कोरली जातात. त्यातील मला भावलेली काही भावसूत्रे येथे दिली आहेत.
१. आनंद देणारा विचार पकडून ठेवणे : जो विचार आपल्याला अस्वस्थ करतो, तो टाकून द्यायचा आणि जो विचार आनंद देतो, तो पकडून ठेवायचा.
२. वेळेचा उपयोग : वेळ वाया घालवणे, म्हणजे आपले सामर्थ्य गमावणे आहे. जो उत्साही, ध्येयनिष्ठ, सकारात्मक असेल, तोच वेळेचा सर्वाेत्तम उपयोग करू शकतो. जो चिंताग्रस्त, आळशी, नकारात्मक आहे, तो वेळेचा दुरुपयोग करतो.
३. प्रत्येक क्षणी देवाला अनुभवणे : आपण जी प्रत्येक कृती करतो, त्यासाठी देवच आपल्याला शक्ती देतो किंबहुना ‘तोच आपल्या माध्यमातून प्रत्येक कृती करतो’, हे लक्षात घेऊन प्रत्येक क्षणी देवाला अनुभवले पाहिजे.
४. भावपूर्ण सेवेचे महत्त्व : सेवा आपल्याला ईश्वराकडे घेऊन जात नाही, तर सेवेतील भाव आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे सेवा भावपूर्ण करावी.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेची जाणीव ठेवणे : ‘साधनेचे प्रयत्न करण्याची इच्छा होणे, म्हणजेच गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, याची ती खूण आहे. गुरुदेवांच्या कृपेची जाणीव आपल्याला जेवढी अधिक असेल, तेवढा आपल्याला आनंद अधिक मिळेल.
६. मनात कृतज्ञता भाव जोपासणे : आपल्या विचारांची दिशा नेहमी कृतज्ञतेकडे हवी. ‘गुरुदेव आपल्यासाठी एवढे करत आहेत, त्याविषयी आपल्या मनात कृतज्ञताभाव आहे ना ?’, याचा आढावा सतत घ्यायला हवा.
७. ‘मी भगवंताचा आणि भगवंत माझा’, या भावावस्थेत परमानंद आहे. तो आनंद अनुभवायचा प्रयत्न करायचा.’
– कु. गीतांजली काणे, फोंडा, गोवा (२६.११.२०२३)