साधकांच्या मनाचा अचूक ठाव घेऊन त्यांना कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला उद्युक्त करणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४१ वर्षे) !
आज कार्तिक कृष्ण चतुर्थी (१.१२.२०२३) या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. सुप्रिया माथूर यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. साधकाच्या मनाच्या स्थितीविषयी अचूकतेने सांगणार्या सौ. सुप्रिया माथूर !
‘साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या सौ. सुप्रिया माथूर प्रत्येक साधकाला त्याच्या प्रसंगानुसार योग्य दृष्टीकोन देतात. ‘साधक प्रसंगात नेमके कुठे न्यून पडले ? त्यांची प्रयत्नांची दिशा आणि चिंतन कसे असायला हवे ?’, याविषयी सुप्रियाताई इतक्या अचूकपणे सांगतात की, असे वाटते, ‘प्रसंग आता घडत आहे आणि त्या प्रसंगात माझ्या मनाची स्थिती ताईंनी वर्णन केल्याप्रमाणेच होती.’ मला माझ्या मनाची स्थिती शब्दांत जरी मांडता आली नाही, तरी ‘ताईंना ते कसे समजले ?’, असे मला वाटते.
२. साधकांच्या प्रकृतीनुरूप प्रत्येक साधकाला वेगवेगळे दृष्टीकोन देणे आणि त्या वेळी ‘शब्द दैवी वाणीतून निघत आहेत’, असे वाटणे
व्यष्टी साधनेच्या आढाव्यात अनेक साधक असतात. प्रत्येक साधकाची प्रकृती निराळी आहे. त्यानुसार ताई साधकांना वेगवेगळे प्रयत्न करायला सांगतात. ताई साधकांना ‘प्रसंगाकडे नेमकेपणाने कसे बघायचे ?’, याची दृष्टी देतात. त्या साधकांना ‘प्रसंगात योग्य कृती कशी असायला हवी ? संघर्षाचा कालावधी न्यून कसा होईल आणि पुढच्या टप्प्याला तो संघर्षच व्हायला नको, अशा स्थितीपर्यंत जाता यावे’, अशा दृष्टीने दिशा देतात. त्या साधकांना इतक्या सहजतेने दृष्टीकोन देतात की, ‘ते सर्व दैवी आहे’, असेच वाटते.
३. साधकांच्या प्रकृतीचा अभ्यास करणे आणि साधकांनी सांगितलेल्या प्रसंगात त्यांचा आढळून आलेला स्वभावदोष दूर होण्यासाठी त्यांना त्वरित स्वयंसूचना बनवून देणे
आम्ही सांगत असलेल्या प्रसंगावरून ‘ताईंना आमच्या प्रकृतीचा अभ्यास लगेच होतो’, असे लक्षात येते. एखादा प्रसंग घडल्यानंतर ‘त्यात नेमका कोणता स्वभावदोष होता किंवा स्वयंसूचना कशी बनवायची ?’, हे आमच्या लक्षातही येत नाही; मात्र ताईंना एकही प्रसंग पुन्हा सांगावा लागत नाही. त्या प्रसंग एकदाच ऐकूनही त्यात साधकांचा आढळून आलेला स्वभावदोष दूर होण्यासाठी त्यावर स्वयंसूचना सांगतात आणि योग्य दृष्टीकोन देतात, हे वैशिष्ट्यपूर्ण वाटते.
४. साधकांना कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला उद्युक्त करणे
आजपर्यंत मी केवळ सारणीलिखाण (टीप) करत होते आणि एखाद्याच चुकीच्या संदर्भात माझ्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न होत असत. अन्य सगळे केवळ वहीतच रहायचे. ताई घेत असलेल्या आढाव्यामुळे माझ्याकडून प्रत्येक पैलूवर कृतीच्या स्तरावर प्रयत्न होऊ लागले. ताई आढाव्यात साधकांकडून होणार्या प्रयत्नांविषयी विचारतात. त्यामुळे आपल्या प्रयत्नांना कलाटणी मिळते.’
(टीप : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती आणि विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती किंवा विचार लिहिणे.)
– सौ. प्रार्थना गुजराथी, दाभोळ, दापोली, जि. रत्नागिरी. (१०.२.२०२२)