प्रेमळ आणि सेवेची पुष्कळ तळमळ असलेल्या फोंडा, गोवा येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा करी (वय ६६ वर्षे) !
‘श्रीमती मीरा करीकाकू आमचा व्यष्टी साधनेचा आढावा (टीप १) घेतात. आम्ही सेवा करण्यासाठी शेजारीच बसतो. त्यामुळे मला त्यांच्याकडून सेवेतील अनेक बारकावे शिकता येतात. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी (१.१२.२०२३) या दिवशी श्रीमती मीरा करी यांचा ६६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(टीप १- साधक करत असलेला ‘नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयोग, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, याविषयी जाणून घेऊन त्याला साधनेची योग्य दिशा देणे)
श्रीमती मीरा करी यांना ६६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. आनंदी आणि प्रेमळ
श्रीमती मीरा करीकाकू स्वतः नेहमी आनंदी असतात आणि त्या इतरांनाही आनंद देतात. त्या सर्वांची पुष्कळ प्रेमाने विचारपूस करतात. त्यामुळे साधक त्यांच्याशी मोकळेपणे बोलू शकतात. सेवेतील सर्व साधकांना त्या हव्याहव्याशा वाटतात.
२. चुकांचे गांभीर्य असणे
काकूंकडून कधी चूक झाली, तर त्या सेवेतील साधकांसमोर त्यांची चूक सांगून क्षमा मागतात आणि ‘माझ्याकडून आणखी कुठली चूक झाली असेल, तर मला सांगा’, असेही सांगतात.
३. सेवेची तळमळ
अ. त्या आठवड्यातून एक दिवस घरी थांबतात; पण त्या दिवशी त्यांना एखादी तातडीची सेवा आली, तर त्या घरी न थांबता आश्रमात सेवेला येतात.
आ. आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना त्या ‘आम्ही स्वभावदोषांवर घेत असलेल्या स्वयंसूचना योग्य आहेत ना ?’, ते पहातात. स्वयंसूचना योग्य नसतील, तर त्या स्वयंसूचना नीट बनवून देतात.
इ. कधी एखाद्या साधकाच्या मनात कुणा साधकाविषयी विकल्प आले, तर काकू सांगतात, ‘गुरुदेवांनी आपल्याला आपल्या गुणदोषांसह स्वीकारले असून ते समष्टीसाठी हानीकारक चुकाच सांगतात, तसे आपणही त्यांचे गुण पहायचे आणि समष्टीसाठी हानीकारक चूक असेल, तरच ती सांगायची.
ई. त्या कधी गावाला गेल्या, तर ‘साधकांच्या आढाव्यात खंड पडू नये’, यासाठी आमच्या आढाव्याचे नियोजन करून जातात आणि ‘आमचा आढावा होत आहे ना ?’, हेही भ्रमणभाष करून विचारून घेतात.
उ. त्यांना सायटीकाचा (टीप २) त्रास होत असूनही त्या त्यांच्या सेवा चिकाटीने आणि समयमर्यादेतच पूर्ण करतात. तेव्हा ‘सेवा करण्यासाठी गुरुदेवच मला शक्ती देत आहेत आणि माझ्याकडून सेवा करून घेत आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
(टीप २ – कटीपासून (कंबरेपासून) पायाच्या घोट्यापर्यंत पसरणार्या वेदना)
४. भाव
अ. काकू सतत अंतर्मुख आणि भावावस्थेत असतात. त्यांच्यामुळे मला ‘भावाचे प्रयत्न कसे करायचे ?’, ते शिकता येते.
आ. त्यांच्या भावावस्थेमुळे त्यांचे बोलणे आमच्या अंतर्मनापर्यंत पोचते. त्यामुळे आमच्याकडून तशी कृती करण्याचे प्रयत्न होतात.
इ. त्यांच्यातील भावामुळे त्यांनी फलकावर लिहिलेल्या सुवचनातूनही आमची भावजागृती होते.
‘गुरुदेवा, करीकाकूंमधील सेवेची तळमळ, चिकाटी आणि तुमच्या प्रती असलेला भाव माझ्यातही निर्माण होऊ दे’, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, फोंडा, गोवा. (८.११.२०२३)