अक्षम्य हलगर्जीपणा !
बिहार राज्यात असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एक पराक्रम नुकताच उघड झाला आहे ! जिल्हा शिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयातून काढलेल्या आदेशानुसार ४६ पदवीधर, तसेच पदव्युत्तर शिक्षकांना प्राचार्य पदावर त्यांच्याच वेतनश्रेणीत रिक्त असलेल्या मुख्याध्यापक पदावर पूर्णवेळ काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये ४ वर्षांपूर्वी निधन झालेले शिक्षक उपेंद्र कुमार यांनाही मुख्याध्यापक बनवून कागदोपत्री शाळेत नियुक्त करण्यात आले आहे ! जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. ही बातमी वाचून मन सुन्न झाले. कार्यालयीन कामे करतांना प्रत्येक स्तरावर, मनुष्यपरत्वे अल्प-अधिक प्रमाणात त्रुटी राहू शकतात, हे जरी एकवेळ मान्य केले, तरी ‘मृत माणूस जिवंत दाखवणे’, ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. या निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणाला काय म्हणावे ? शिक्षण विभागात कार्यालयीन कामकाजात किती परकोटीचा अनागाेंदी कारभार चालतो याचे हे अत्यंत बोलके उदाहरण आहे ! उपेंद्र कुमार यांच्या निधनाला ४ वर्षे उलटली असूनही त्यांची जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कर्मचार्यांशी संबंधित धारिका अद्ययावत् झाली नसल्याचे यातून स्पष्ट होते. जर ते पूर्वीच निवृत्त झाले असतील, तर त्यांची सेवा पुस्तिका (Service Book), हजेरीपट बंद करण्यात आला नाही का ? तसेच जर ते पदावर कार्यरत असतांना त्यांचा मृत्यू झाला असेल, तरीही त्या संदर्भातील कार्यालयीन प्रक्रिया वेळच्या वेळी पूर्ण झाली नाही का ? मृत्यूनंतरही ४ वर्षे उपेंद्र कुमार हे शिक्षकपदी कार्यरत आहेत, असे दिसत असल्यास त्यांना ४ वर्षांत पात्रता नसतांना दिल्या गेलेल्या वेतनाचे काय ? शासनाच्या निधीचा असा अपव्यय झाला असेल, तर तो कोण आणि कसा भरून काढणार ? हे पैसे परस्पर घेण्यासाठी कुणी जाणूनबुजून केले आहे का ? असाही संशय यामुळे बळावतो. कर्मचार्यांच्या असंवेदनशीलतेमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे शासनाला किती भुरदंड सोसावा लागतो याची गणना कोण करणार ? यात उपेंद्र कुमार यांच्या कुटुंबियांनाही मानसिक क्लेश झालेले असू शकतात, ते वेगळेच ! या सर्व प्रकाराला उत्तरदायी कर्मचारी आणि अधिकारी यांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच त्यांना योग्य शासन करण्यात यावे; जेणेकरून कामकाजाप्रती हलगर्जीपणा करणार्यांवर वचक बसेल ! कार्यालयीन व्यवस्थेतील उणिवा किंवा त्रुटी यांचा किती आणि कशा प्रमाणात अपलाभ घेतला जाऊ शकतो, याचाही अभ्यास करून त्या दूर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, गोवा.