छत्रपती संभाजीनगर येथे प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्यांच्या ११ ठिकाणी धाडी !
छत्रपती संभाजीनगर – प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्यांनी ३० नोव्हेंबरच्या पहाटे ६ वाजता शहरातील बांधकाम क्षेत्रातील ११ मोठ्या व्यावसायिकांची कार्यालये आणि निवासस्थाने येथे धाड घातली. सर्व ठिकाणी एकाच वेळी धाड घालण्यात आली.
बांधकाम व्यावसायिकांनी कर चुकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचे घर आणि कार्यालये यांवर धाडी घालून कर भरण्याशी संबंधित दस्ताऐवज पडताळून पाहिले जात आहेत. ही कारवाई पुढील २ ते ३ दिवस चालू रहाणार आहे, अशी माहिती आहे. या कारवाईविषयी विभागाने गुप्तता बाळगली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील एका कारखान्यावर धाड घालून अनुमाने २५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली होती.