सातारा येथे राजवाडा ते रेल्वेस्थानक बससेवा पूर्ववत् !

सातारा, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – राजवाडा ते रेल्वेस्थानक बससेवा पूर्ववत् करण्यात आली आहे. यामुळे शहरात वास्तव्य करणार्‍या अनेक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे. श्रीक्षेत्र माहुली या ठिकाणी रेल्वेस्थानक असून राजवाड्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. मधल्या कालावधीत काही बसगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकाला ये-जा करण्यास अडचण येत होती, तसेच रिक्शाचालकांकडून लांबून येणार्‍या प्रवाशांकडून अधिक भाडे आकारले जात होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांकडून अनेक वेळा एस्.टी. महामंडळाकडे राजवाडा-मध्यवर्ती बसस्थानक-रेल्वेस्थानक अशा बससेवेची मागणी केली जात होती. या मागणीची नोंद घेऊन मध्यवर्ती बसस्थानकाकडून आता पहाटे ४.३० वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राजवाडा-मध्यवर्ती बसस्थानक-रेल्वेस्थानक अशी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.