विनाअनुमती कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस ! – उपायुक्त दत्तात्रेय घनवट, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका

नवरात्रीविषयी आक्षेपार्ह कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण

नवी मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तुर्भे गावातील महापालिकेच्या शाळेमध्ये नवरात्रीत केल्या जाणार्‍या उपवासाविषयी आक्षेपार्ह कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार चौकशी समितीच्या अहवालात हा कार्यक्रम घेण्यास शिक्षण विभागाची अनुमती घेतली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली.

१. सकल हिंदु समाज, तसेच विश्‍व हिंदु परिषद, नवी मुंबई शाखा यांच्या वतीने या प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच सानपाडा येथील रहिवासी सौ. कमल गिरमकर यांनी या संबंधीचे वृत्त वर्तमानपत्रात वाचल्यावर त्यांनी ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

२. त्यांच्या तक्रारीवर अद्याप पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊनही कार्यक्रमातील वक्त्यांवर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने भाविकांकडून अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. (हिंदु धर्माच्या विरोधात कार्यक्रम घेऊनही बहुसंख्य हिंदूंच्या भारतात संबंधितांवर कारवाई न होणे, हे पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांना काडीचीही किंमत देत नसल्याचे लक्षण आहे. पोलीस आणि प्रशासन काय केल्यावर हिंदूंना न्याय देईल ! – संपादक)

अंनिसच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम थांबवण्याची तक्रार करून मागणी !

अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठांवर का येते ?

आयुक्तांकडे देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, नवरात्रीत हिंदु धर्म,  संस्कृती यांविरोधात एक कार्यक्रम महापालिकेच्या तुर्भे गाव शाळा क्र. १०७ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक वर्तमानपत्रांत बातमी प्रसिद्ध झाली आहे. हा कार्यक्रम धार्मिक भावना भडकावून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट आहे. समाजामध्ये अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन अराजकता माजू शकते. त्याला महापालिका आणि आयोजक, मुख्याध्यापक, वक्ता हे कारणीभूत ठरतील. अंनिस केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करत कोट्यवधी भक्तांचा अपमान करत आहे. तसेच संविधानाने दिलेल्या धार्मिक पालन स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर घाला घालत आहे. त्यामुळे समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि सर्व संबंधित कर्मचारी, वक्ता, आयोजक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या अंनिसच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये काही उपक्रम राबवले जात आहेत, ते त्वरित बंद करण्यात यावेत आणि यापुढे कोणतेही उपक्रम राबवण्यास अंनिसला अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांनी दिली. त्यावर चौकशी समिती नेमून अहवाल मागवण्यात आला होता. यामध्ये वरील गोष्ट उघड झाली आहे.

संपादकीय भूमिका 

केवळ नोटीस देऊन न थांबता प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !