मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ ! – श्री. सुरेश कौद्रे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान
मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी ओझर येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ !
ओझर (जिल्हा पुणे) – मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ आहे, असे वक्तव्य भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौद्रे यांनी केले. मंदिरांचे जतन, संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ आणि ३ डिसेंबर २०२३ या दिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. कौद्रे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अनेक संत-महंत या परिषदेला उपस्थित रहाणार आहेत, याचा आम्हाला पुष्कळ आनंद आहे. मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे. मंदिरांचे संघटन करण्यासाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची आहे.
या प्रसंगी श्री विघ्नहर ओझर गणपति मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश कवडे, श्री लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांसह सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचीही वंदनीय उपस्थिती होती.
‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याच्या व्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. तरी या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने एक मंत्री उ सत्राला उपस्थित राहील, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिरे हिंदु धर्माचा आधारस्तंभ होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये
या वेळी उपस्थित सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की, मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. ही मंदिरे हिंदु धर्माचा आधारस्तंभ होणे आवश्यक आहे आणि मंदिरांतून हिंदूंना धर्मशिक्षण मिळायला पाहिजे.