(म्हणे) ‘आम्ही सांगत होतो, तेच समोर आले आहे !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा पुन्हा एकदा भारताला उद्देशून दावा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – अमेरिकेकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे आम्ही आधीपासून जी मागणी करत आलो, तीच अधोरेखित झाली आहे. हे सगळे प्रकरण भारत सरकारने गांभीर्याने घ्यायची आवश्यकता आहे, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा केले आहे. अमेरिकेने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला अटक केल्याच्या घटनेनंतर ट्रुडो यांनी हे विधान केले आहे. यापूर्वी ट्रुडो यांनी कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या झालेल्या हत्येवरून भारतावर आरोप केला होता. त्या वेळी भारताने हा आरोप फेटाळला होता. या आरोपावरून दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम झाला आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेने पन्नू याच्या हत्येच्या कट रचल्याच्या आरोपावरून भारतीय नागरिकाला अटक केली असली, तरी हा आरोप अद्याप सिद्ध व्हायचा आहे. पाश्‍चात्त्य देश अन्य देशांना दाबण्यासाठी कोणतेही खोटे आरोप करण्यास मागेपुढे पहात नाहीत. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन याच्यावर रासायनिक शस्त्रे असल्याचा खोटा आरोप करत त्याच्या देशावर आक्रमण करून त्याला फासावर लटकवले; मात्र त्याच्याकडे रासायनिक शस्त्रे मिळाली नाहीत. अशा अमेरिकेवर आणि पाश्‍चात्त्य देशांवर विश्‍वास ठेवता येणार नाही !