Indian Navy Day 2023 Reharsals : नौदल दिनानिमित्त तारकर्ली (मालवण) येथे नौदलाच्या चित्तथरारक कसरती !
मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) : ४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे होणार्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या शस्त्रसज्ज ताफ्याने तारकर्ली समुद्रकिनारी २७ नोव्हेंबरपासून सराव चालू केला आहे. हा सराव पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून नौदलाच्या सामर्थ्याची थोडी चुणूक नागरिकांना अनुभवता आली. या वेळी लढाऊ विमानांच्या आवाजाने संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता.
नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा तारकर्ली येथील समुद्रात २८ नोव्हेंबरला सायंकाळी दाखल झाला. सायंकाळी ५ वाजता नौदलाचे मरीन कमांडो भारताचा तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकावत ‘पॅराशूट’मधून खाली उतरले अन् नौदलाच्या सरावाला प्रारंभ झाला. त्यानंतर आय्.एन्.एस्. विक्रमादित्य, आय्.एन्.एस्. कोलकाता, आय्.एन्.एस्. तलवार, आय्.एन्.एस्. ब्रह्मपुत्र, आय्.एन्.एस्. सुभद्रा आदी युद्धनौकांनी सरावात सहभाग घेतला. तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट (लढाऊ विमाने) आणि हेलिकॉप्टर यांनी चित्तथरारक कसरती केल्या. मरीन कमांडोंसह नौदलाचे अन्य विभागही सहभागी झाले होते.
(सौजन्य : SamarthNews1)
युद्धनौकांवरून केले जाणारे आक्रमण, शत्रूच्या आक्रमणाला सामोरे जाणे, समुद्री चाच्यांवर कमांडोंनी आक्रमण करणे, अशी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ३ डिसेंबरपर्यंत प्रतिदिन नौदलाकडून हा सराव केला जाणार आहे.
नौदल दिनाचा कार्यक्रम सर्वांना पहाता येण्यासाठी दांडी आणि तारकर्ली येथे विशेष व्यवस्था !
मालवण : नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण येथे येणार आहेत. या दिवशी प्रारंभी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अन्य मान्यवर तारकर्ली येथे होणार्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वसामान्यांना पहाता यावा, यासाठी शहरातील दांडी आणि तारकर्ली या ठिकाणी खास व्यवस्था करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० नोव्हेंबर या दिवशी मालवण येथे येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे पत्रकारांना दिली.
मंत्री चव्हाण यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उभारणीचे काम, तारकर्ली येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था, टोपीवाला बोर्डिंग मैदान येथील ‘हॅलिपॅड’ या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही मालवणला येणार !
नौदल दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही केंद्रीय आणि राज्यातील काही मंत्री उपस्थित रहाणार आहेत, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.