अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे अहिल्यानगर येथील श्री विशाल गणपति मंदिरात पूजन !
विहिंपचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन निमंत्रण देणार !
अहिल्यानगर – अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ या दिवशी होत आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या सूचनेनुसार विश्व हिंदु परिषदेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदूंच्या सहकार्याने अयोध्येतील श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिव्य सोहळ्यात सर्व हिंदूंनी सहभागी होण्यासाठी अभिनव असे ‘निमंत्रण संपर्क अभियाना’चे आयोजन केले आहे. अवध प्रांतामध्ये घरात, गावात कोणतेही मंगलकार्य असेल, तर अक्षता वाटून निमंत्रण दिले जाते. याच पद्धतीने या मंगलक्षणी जगभरातील सर्व हिंदूंनी सहभागी व्हावे, यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरी जाऊन राम लल्लाच्या गर्भगृहात मंत्र उच्चाराने पवित्र केलेल्या अक्षता, निर्माणाधीन श्रीराम मंदिराचे चित्र आणि सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्र देण्याची योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांचे कार्यकर्ते १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत करणार आहेत.
५ नोव्हेंबरला अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या राम लल्लाच्या भव्य मंदिरात पूजन करून पवित्र केलेल्या मंगल अक्षतांचे कलश प्रत्येक प्रांताला प्रदान करण्यात आले. २६ नोव्हेंबरला पुणे येथून नगरला आणण्यात आलेल्या अक्षतांच्या कलशाचे पूजन रात्री ७.३० वाजता विशाल गणपति मंदिर माळीवाडा येथे श्री विशाल गणपति मंदिराचे महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर येथे जिल्ह्यातील सर्व गावांमधील भाविकांना अयोध्या येथील श्रीरामाच्या दर्शनासाठी यावे; म्हणून निमंत्रण देण्यासाठी कलशातील अभिमंत्रित तांदळाचे वाटप विश्व हिंदु परिषदेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन करणार आहेत. |