श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्रीराम साहित्य विशेषांकांचे ‘ई-बुक’ प्रकाशित करणार !
नागपूर – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या निमित्ताने विश्व हिंदु परिषद महाराष्ट्र-गोवाद्वारे साहित्यांजली उपक्रमाअंतर्गत श्रीराम साहित्य विशेषांकांचे ‘ई-बुक’ प्रकाशित करण्यात येत आहे, अशी माहिती विहिंपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे मंदिर अन् अर्चक-पुरोहित संपर्क आयामाचे क्षेत्र संपर्क प्रमुख अनिल सांबरे यांनी दिली.
रामायणातील एक एक चरित्र म्हणजे त्याग, तपस्या, बंधुप्रेम यांचा लखलखीत आदर्श आहे; परंतु इंग्रजांनी हा इतिहास पालटून कलंकित केला. हा इतिहास पराभवाचा आहे, हे बिंबवले. जगात श्रेष्ठ असणारी संस्कृती आणि सभ्यता यांची निंदानालस्ती आपण मूकदर्शक बनून इतकी वर्ष पाहिली. कलंकित इतिहास पुसण्यासाठी ‘श्रीराम साहित्य विशेषांक’ प्रकाशित होणार आहे.
समर्थ रामदासस्वामींनी पराभूत समाजात वीर हनुमंताच्या गुणांचे जागरण केले. स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, स्वामी श्रद्धानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुहितकारी अन् तेजस्वी तत्त्वज्ञान अन् पाथेयामुळे देशाला ‘स्व’ शोधाचा मार्ग सापडला आहे. यानिमित्ताने श्रीराम चरित्र, जीवनकार्य , राम गमन स्थान विशेष महत्त्व, काही आक्षेप घेत हिंदु धर्मावर होणारे आरोप आणि श्रीराम मंदिर विषयावर विश्व हिंदु परिषद, महाराष्ट्र अन् गोवा यांच्याद्वारे ‘ई-बुक’चे प्रकाशन होणार आहे. आपल्या कथा, कविता, संधर्भ कथा, क्षेत्र विशेष, संग्रहणीय गोष्टी, छायाचित्रे यांची नोंद नव्या विशेषांकात घेतली जाईल.