चीनने खेळलेल्या डावामुळे म्यानमारचे लवकरच तुकडे होण्याचे संकेत !
|
रंगून (म्यानमार) –
म्यानमारचे राजकीय वातावरण अत्यंत स्फोटक बनले असून लवकरच त्याचे तुकडे होऊ शकतात. हे स्वत: म्यानमारच्या राष्ट्रपतींनीही मान्य केले आहे. गेल्या २ वर्षांपासून तेथील बंडखोर गट आणि सैन्य यांच्यात संघर्ष चालू असून म्यानमारच्या मोठ्या भूभागावर बंडखोर गटांनी नियंत्रण मिळवले आहे. या गटांनी भारत-म्यानमार यांना जोडणार्या २ पैकी एक रस्ताही कह्यात घेतला असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे मानले जात आहे. या बंडखोर गटांना चीनची फूस आहे. चीनने नेहमीच या गटांचे समर्थन केले असून म्यानमारवर स्वत:चा प्रभाव पाडण्याचा त्याचा वाढता प्रयत्न आहे. सशस्त्र बंडखोर गटांमध्ये ‘थ्री ब्रदरहुड अलायंस’ हा गट आघाडीवर असून त्याला चीनचे समर्थन प्राप्त आहे.
१. उद्या जर बंडखोर गटांनी म्यानमारमध्ये सध्या असलेल्या सैन्याच्या सरकारला उलथवून टाकले, तर या गटांच्या माध्यमातून चीनचे म्यानमारवर वर्चस्व प्रस्थापित होईल. त्याचा फटका थेट भारताला बसणार असून ईशान्य भारताच्या सुरक्षिततेला ही परिस्थिती अत्यंत मारक ठरेल, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे म्हणणे आहे.
२. बंडखोर गटांनी चीनशी लागून असलेल्या सीमेवरही नियंत्रण मिळवले आहे. अशातच चीनने स्वत:च्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाचे कारण देत सीमेवर व्यापक युद्धाभ्यास चालू केला आहे. यासाठी चीनने मोठ्या तोफा आणि रडार यांची तैनातीही केली आहे. ही माहिती चीन सरकारचे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’नेच दिली.
म्यानमार संघर्ष हा भारताच्या ईशान्य क्षेत्रासाठी धोक्याची घंटी !‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’चे प्रा. अविनाश पालीवाल यांनी या परिस्थितीविषयी सांगितले की, म्यानमारचे तुकडे होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. चीनचा सैन्याभ्यास न केवळ त्याच्या सीमेचे रक्षण करणे आहे, तर त्या माध्यमातून त्याला पाश्चात्त्य देशांना संदेश द्यायचा आहे की, चीन त्याच्या सीमाक्षेत्रांना स्थिर करू इच्छितो. म्यानमारवर चीनचा हा वाढता प्रभाव भारताच्या ईशान्य क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे. ईशान्य भारत आधीपासूनच आतंकवादी आणि जातीय हिंसा यांच्यामुळे होरपळला आहे. |
संपादकीय भूमिका
|