माजी मंत्री सुनील केदार यांच्या घोटाळ्याचा निकाल १८ डिसेंबरला !
१४९ कोटी रुपयांच्या होम ट्रेड घोटाळ्याचे प्रकरण
नागपूर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत वर्ष २००२ मध्ये उघडकीस आलेल्या १४९ कोटी रुपयांच्या ‘होम ट्रेड घोटाळ्या’प्रकरणी १८ डिसेंबर या दिवशी निकाल घोषित करण्यात येणार आहे. यातील दस्तऐवज बरेच मोठे आहेत. साक्षीदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आजच निकाल देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. घोटाळ्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.व्ही. पेखले-पूरकर यांच्या न्यायालयात २८ नोव्हेंबर या दिवशी शिक्षा सुनावली जाणार होती.
१. सुनील केदार आणि इतर ७ संचालक यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने यापूर्वी उठवली होती. त्यामुळे प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला होता. तेव्हापासून वर्षभरात प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने प्रतिदिन सुनावणी घेण्यात आली.
२. अंकेक्षण अधिकार्यांनी २० डिसेंबर २००२ या दिवशी सहकारी संस्था उपनिबंधकांना अहवाल सादर केला. त्यात बँकेच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळले. अंकेक्षण अहवालातून बँकेत १४९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. राज्यशासनाच्या आदेशानुसार वाय.एस्. बागडे यांनी केलेल्या चौकशीत २७ आरोपी आढळले. डिसेंबर २०१३ मध्ये बागडे यांनी दिलेल्या अंतिम आदेशात ८ जणांविरुद्ध आरोप सिद्ध होऊन १९ जणांची निर्दोष सुटका केली.
३. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार सुनील केदार, माजी सरव्यवस्थापक अशोक चौधरी, माजी उपाध्यक्षा आशा महाजन, श्यामराव धवड, कुसुमताई किंमतकर, मोरबा निमजे, रमेश निमजे आणि संतोष चोरे या संचालकांचा दोषींमध्ये समावेश आहे.