आज सांगली येथे ‘बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आ.वा. दातारशास्त्री चौक’ नामकरण सोहळा !
सांगली – बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आत्मराज वामन दातारशास्त्री हे भारतातील आयुर्वेद क्षेत्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आयुर्वेद शास्त्रात संशोधन केले आणि त्यातून ‘पांचभौतिक चिकित्सा प्रणाली’ उदयास आली. त्यांनी केलेल्या या कार्याविषयी डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर चौकास ‘बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आ.वा. दातारशास्त्री चौक’ नामकरण सोहळा ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता ‘आयुर्वेद व्यासपीठ’ या राष्ट्रीय संघटनेच्या सांगली जिल्हा शाखेकडून आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती ‘आयुर्वेद व्यासपीठ’ सांगलीचे अध्यक्ष वैद्य रवींद्रकुमार माने आणि कार्यवाह वैद्य शिवकांत पाटील यांनी दिली.
वैद्य रवींद्रकुमार माने आणि वैद्य शिवकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘पांचभौतिक चिकित्साप्रणालीच्या माध्यमातून ५ सहस्र आयुर्वेदिक डॉक्टर देशभरात सेवा देत आहेत. दातारशास्त्रींनी गावभागात रुजवलेले आयुर्वेदीय पांचभौतिक चिकित्सेचे रोप भारतभर विस्तारले आहे. या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ, वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी, वैद्य योगेश माईणकर यांसह अन्य उपस्थित रहाणार आहेत. तरी नागरिकांनीही उपस्थित रहावे.’’