महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना श्री. रामचंद्र शेळके (वय ६७ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये अन् शिकायला मिळालेली सूत्रे !

नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले श्री. रामचंद्र शेळके यांचा परिचय आणि त्यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये आपण या लेखाच्या पहिल्या भागात पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

श्री. रामचंद्र शेळके
कु. रेणुका कुलकर्णी
कु. म्रिण्‍मयी केळशीकर

२. कु. रेणुका कुलकर्णी आणि कु. म्रिण्मयी केळशीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

२ अ. गुणवैशिष्ट्ये

२ अ १. परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती असणारा भाव : ‘नाट्यवर्गांत शिकवतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे केवळ नाव आले, तरी त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहायला लागतात. यावरून त्यांचा गुरुमाऊलीविषयी असलेला भाव लक्षात आला.

२ अ २. शिकवण्याची तळमळ : त्यांना आमचा नाट्यवर्ग घेण्याची तळमळ असते. त्यांना कोरोना होऊन गेल्यानंतर सध्या थकवा वाटत असूनही ते नाट्यवर्ग घ्यायला येतात आणि तळमळीने शिकवतात. नाट्यवर्गातील प्रत्येकाच्या कृतीकडे त्यांचे समान लक्ष असते. नाट्याचे प्रकार करतांना ‘कोण कुठे चुकले, अजून काय सुधारणा करू शकतो ?’, हे ते आवर्जून सांगतात.

२ अ ३. देश-विदेशातील नाटकांमध्ये कामे करूनही अहं अल्प असणे : त्यांना अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी देशविदेशात नाटक आणि चित्रपट यांमध्ये कामे केली आहेत; परंतु त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहं जाणवत नाही. ते गेली ४० वर्षे या क्षेत्रात शिकवत आहेत, तरीही ते आदल्या दिवशी विषयाचा अभ्यास करूनच वर्गाला येतात.

२ अ ४. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे : आम्ही नाट्याचे काही प्रकार प्रथमच करत असल्याने ते प्राथमिक टप्प्याचे असतात, तरीही शेळकेकाका आम्हाला मनापासून शिकवतात. वर्गांत त्यांनी काही प्रकार करून दाखवल्यावर ते आम्हालाही करायला सांगतात. आमचे प्रस्तुतीकरण झाल्यावर ते आमचे कौतुक करतात. आमचे थोडे प्रयत्न बघूनही त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. त्यांच्या मुखी ‘वाह ! किती छान केले !’, असे उद्गार येतात.

२ अ ५. गुणग्राहकता : संगीत विभागातील काही साधकांना एकापेक्षा अनेक कलागुण अवगत आहेत, उदा. एका साधिकेला नृत्य आणि चित्रकला येते. अन्य एका साधिकेला अभिनयासह गायनही येते. एका साधकाला वादन आणि शिवणकामही येते. ‘अशा सर्व साधकांचा पुढे नाटकासाठी कुठे कुठे उपयोग करून घेऊ शकतो’, असा त्यांचा विचार असतो.’

२ आ. शिकायला मिळालेली सूत्रे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नाट्यकला शिकणार्‍या साधकांना श्री. रामचंद्र शेळके हे नाट्यकलेचे प्रशिक्षण देत आहेत. या वर्गात श्री. रामचंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी सौ. शुभांगी शेळके, एम्.ए. (नाट्यशास्त्र) हे मार्गदर्शन करतात. या वर्गांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे विद्यार्थी साधक कु. रेणुका कुलकर्णी, कु. म्रिण्मयी केळशीकर आणि श्री. रेशक गावकर हे साधक-विद्यार्थी उपस्थित असतात. नाट्यवर्गामध्ये अभिनयाचे काही प्रात्यक्षिक सराव होतात. त्यामध्ये पुढील सुत्रे शिकायला मिळाली.

२ आ १. प्रात्यक्षिक १ – नाट्यविषयाच्या प्रयोगाच्या आधी किंवा सरावाच्या आधी कलाकाराने निर्विचार अवस्थेत (Neutral state of Mind) जाणे

२ आ १ अ. विश्लेषण : ‘नाट्यशास्त्रामध्ये शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भुत या सर्व रसांची उत्पत्ती ‘शांत’ रसातूनच होते’, असे म्हटले जाते. त्यामुळे प्रयोगाला आवश्यक असलेल्या ‘स्थायीभावाची निर्मिती’ ही कलाकाराच्या ठायी होण्यासाठी प्रथम त्याने ‘निर्विचार’ अवस्था गाठणे आवश्यक आहे. योग करतांना ‘शवासन’ हे आसन केल्याने व्यक्ती निर्विचार होते. व्यक्तीला आरामदायी स्थितीत नेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचय होण्यास साहाय्य होते. एखादा गायक गायन चालू करण्यापूर्वी मन एकाग्र करतो, तेव्हाच त्याला उत्तम गायन जमते. त्याच प्रकारे ‘स्वतःला निर्विचार (Neutral) करणे’ ही प्रक्रिया कलाकाराला मानसिक आणि शारीरिक आराम देऊन प्रयोगासाठी सकारात्मक ऊर्जा देत असते. प्रयोगाआधी कलाकाराने स्वतःला निर्विचार करणे आवश्यक असते. त्यानंतर कलाकार तो साकारत असणार्‍या पात्राशी एकरूप होऊ शकतो.

२ आ १ आ. कृती : या प्रयोगात व्यक्तीला प्रथम स्वतःला स्थिर करणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे, श्वासाला संथ आणि स्थिर करणे, श्वासाच्या संथ-स्थिर लयीला अनुभवणे इत्यादी कृती शिकवल्या जातात. असे करतांना मनाची अवस्था आपोआप निर्विचार होते. मनाच्या समवेत शरीरही शांत आणि स्थिर होते. शरिरातील पेशीन्पेशी शांत होतात.

२ आ १ इ. अनुभूती : वरीलप्रमाणे प्रयोगापूर्वी श्री. शेळके यांनी ‘मनात काही विचार नको. आपली साधक म्हणून जी ओळख आहे, तीसुद्धा नको’, असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने मन एकदम विचाररहित झाले. पूर्वी मनात अनावश्यक विचारांची दाटी होती. हे विचार घेऊन ‘एखादी कला प्रस्तुत करणे किंवा पात्र साकारणे किती अवघड आहे’, हे लक्षात आले. त्यामुळे ‘प्रथम निर्विचार अवस्था गाठून मगच कलेचे प्रस्तुतीकरण करणे, किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात आले.

२ आ २. प्रात्यक्षिक २ – पंचज्ञानेंद्रियांद्वारे सात्त्विक अभिनय वृद्धींगत करणे  (Work on five senses to increase ability of sattvik Abhinaya)

२ आ २ अ. विश्लेषण : कोणताही कलाकार त्याच्या पंचज्ञानेंद्रियांचा वापर करून कला साकारत असतो. कुठलीही कला साकारण्यासाठी कलाकाराला कलेविषयीच्या ‘शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध’, अशा सर्वच घटकांना जाणून घेणे आवश्यक आहे.

कलाकार जेवढा निसर्गाचा अभ्यास आणि निरीक्षण करतो, तेवढा त्याच्या कलेत जिवंतपणा उतरतो. थोडक्यात या सरावामुळे कलाकाराची शिकण्याची वृत्ती, कल्पकता, सर्जनशीलता, निरीक्षणक्षमता, अंतर्मुखता वाढण्यास साहाय्य होते.

सामान्यपणे मनुष्य ‘नेत्र’ हे इंद्रिय अधिक वापरतो. ते बंद झाले, तर अन्य ज्ञानेंद्रियेही अधिक संवेदनक्षम होतील. ज्याप्रकारे आंधळ्या मनुष्याला गंधावरून ओळखता येते किंवा दूरवरून येणारा सूक्ष्म ध्वनीही ऐकू येतो आणि त्या ध्वनीची स्पंदने जाणवतात, त्याप्रमाणे हा प्रयोग केल्यावर साधक-कलाकाराची उर्वरित ज्ञानेंद्रियेही अधिक संवेदनक्षम होतील. त्याचा त्याला आपल्या अभिनयात नििश्चतपणे लाभ होण्याच्या दृष्टीने हा सराव महत्त्वपूर्ण ठरतो.

२ आ २ आ. कृती : या प्रयोगात साधक-कलाकारांना त्यांचे डोळे बंद करायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी डोळे बंद केल्यावर त्यांना पुढे-पुढे चालायला सांगितले. त्यांना ‘जेथे जावेसे वाटले’, तेथे त्यांना जाऊ दिले. निसर्गातील ‘थंड वारा, प्रखर ऊन, चिखलाचा मऊपणा, दगडांमुळे लागणारी ठेच, गवताचा निसरडेपणा, भिंतींमुळे चालण्यात येणारी बाधा’ इत्यादी सर्व अनुभवायला सांगितले. हे सर्व करतांना साधक-विद्यार्थ्यांचे डोळे पूर्णपणे बंद होते आणि ते ‘मनाला वाटेल, त्या दिशेने पुढे पुढे चालत होते. या चालण्याच्या प्रक्रियेत काही धोकादायक परिस्थिती आल्यास (उदा. खड्डा, तीव्र उतार, प्राणी) तशा सूचना देऊन मार्ग पालटण्यास सांगितला.

२ आ २ इ. अनुभूती : या प्रयोगात श्री. शेळके यांनी आम्हाला डोळे बंद करून पुढे पुढे जायला सांगितले. त्यानुसार आम्ही (रेणुका आणि म्रिण्मयी) निसर्गातील घटकांचा अनुभव घेत जवळजवळ २५ मिनिटे चालत होतो. चालतांना आम्ही निसर्गातील अनेक सूक्ष्म ध्वनी अनुभवले. असे आवाज डोळे उघडे असतांना अनुभवता येणे अशक्य असते; कारण नेहमी वावरतांना वृत्ती बहिर्मुख असते. प्रयोग करतांना मनःस्थिती अंतर्मुख झाली होती. प्रयोगाच्या वेळी मनात कुठलेही विचार आले नाहीत किंवा शरिराचे भानही नव्हते. त्या वेळी मी ध्यानस्थिती अनुभवत होते. प्रयोग झाल्यावरही माझे मन पुष्कळ वेळ शांत राहिले.’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक ७.३.२०२३)
(समाप्त)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.