Indian Navy Day 2023 Reharsals : तारकर्ली येथील समुद्रकिनारी नौदलाच्या युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिकांना प्रारंभ !
नौदलाचे संपर्क अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : भारतीय नौदलाचा २३ वा नौदल दिन ४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तारकर्ली, मालवण येथील समुद्रकिनारी भारतीय नौदल युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके सादर करणार आहे. या समारंभाचा भाग म्हणून नौदलाच्या युद्धनौका २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत येथे तालीम (सराव) करणार होत्या. त्यानुसार आज २८ नोव्हेंबरला युद्धनौकांच्या प्रात्यक्षिकांच्या सरावाला प्रारंभ झाला आहे.
(सौजन्य : Kokansad Live)
या पार्श्वभूमीवर तटीय सुरक्षा पोलिसांनी (कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी) २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सर्व मासेमारी नौका, फेरीबोटी आणि जलक्रीडा चालक यांना प्रात्यक्षिक क्षेत्रापासून दूर रहाण्याचे निर्देश दिले आहेत. नौदलाच्या युद्धनौका पूर्वाभ्यास चालू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर समुद्रामध्ये नांगर टाकून स्थानापन्न होतील. परिणामी तटीय सुरक्षा पोलिसांनी सर्व मासेमारी नौका, फेरीबोटी आणि जलक्रीडा चालक यांना नौदलाच्या युद्धनौकेपासून किमान ५ ‘केबल्स’ अंतरावर दूर ठेवावे. साहाय्यक मत्स्य आयुक्त, सिंधुदुर्ग आणि बंदर निरीक्षक (मालवण), महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनीही स्थानिक मासेमार, जलक्रीडा चालक आणि फेरीबोटी चालकांमध्ये वरील ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. तारकर्ली येथील समुद्रात २८ नोव्हेंबर या दिवशी ‘आय.एन्.एस्. ब्रह्मपुत्रा’सह २ नौका आल्या आहेत.