Shocking : कुडचडे (गोवा) येथे एका महिलेची इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या

(प्रतिकात्मक चित्र)

कुडचडे, २८ नोव्हेंबर (वार्ता.) : कार्‍यामड्डी, कुडचडे येथे अनिता फर्नांडिस (वय ५४ वर्षे) या महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता घडली. यासंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ६ वाजता अनिता यांनी त्यांच्या सदनिकेच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असतांना आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कुडचडे आरोग्य केंद्रात भरती केले. तिथे नेल्यावर डॉक्टरांनी अनिता मृत झाल्याचे घोषित केले. अनिता फर्नांडिस या मूळ सांगे येथील रहिवासी असून त्या  पती आणि मुली यांच्यासह कुडचडे येथे रहात होत्या. त्या उगे सांगे येथे प्राथमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. कुडचडे पोलिसांनी या घटनेच्या पंचनामा केला असून त्या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यासंबंधी पोलिसांचे अन्वेषण चालू आहे. या घटनेमुळे या परिसरातील लोकांना प्रचंड धक्का बसला आहे.

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

(चित्रावर क्लिक करा)

‘सध्या प्रतिदिन होणार्‍या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ आध्यात्मिक उपायांनी म्हणजेच साधनेने मात करता येते, असे अध्यात्मशास्त्र सांगते.

साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. साधनेमुळे केवळ मनाची एकाग्रता साधते असे नव्हे, तर मनःशांतीही मिळते. प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते. एवढेच नव्हे तर जिद्द, चिकाटी यांसारखे गुण निर्माण होऊन ध्येयपूर्तीसाठी ईश्वरी अधिष्ठान लाभून यशप्राप्तीही होते. त्यामुळे साधना हेच सर्व प्रश्नावरील अंतिम उत्तर ठरते. त्यामुळे शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण, साधना इत्यादी गोष्टींचा समावेश असणे अत्यावश्यक ठरते.’