54th iffi 2023 GOA Conclusion : ‘एंडलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला यंदाचा सुवर्ण मयूर पुरस्कार !

५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा समारोप !

पणजी : ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (आंचिममध्ये) अब्बास अमिनी दिग्दर्शित ‘एंडलेस बॉर्डर्स’ या जर्मनी, इराण आणि चेक प्रजासत्ताक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला असून त्याने सुवर्ण मयूर पुरस्कार प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे आंचिमच्या समारोप समारंभात दिग्गज हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

या वेळी मायकल डग्लस म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाचे चित्रपट निर्माता होणे म्हणजे काय, हे सत्यजित रे यांनी दाखवून दिले. त्यांचे चित्रपट केवळ भारतीय चित्रपट उद्योगाच्या यशाचेच नव्हे, तर ‘क्रॉस कल्चर’ (विविध संस्कृतींचे एकत्रीकरण) कलात्मक अभिव्यक्तीची अमर्याद क्षमता दर्शवतात.’’ ‘चित्रपट हे एकमेव माध्यम आहे, ज्याकडे विभाजनाच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणण्याची आणि स्वतःत परिवर्तन करण्याची शक्ती आहे. सध्याच्या काळात चित्रपटाची जागतिक भाषा पूर्वीपेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे’, असेही ते म्हणाले.

आंचिममधील इतर पुरस्कार प्राप्तकर्ते

१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – स्टेफन कोमंदारेव
२. सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुरिया राहिमी सॅम
३. सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्री – मेलानी थिएरी
४. सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म – व्हेन द सीडलिंग्ज ग्रो हा तुर्की चित्रपट
५. आय.सी.एफ्.टी. युनेस्को गांधी पदक – अँथनी चेन यांचा ‘ड्रिफ्ट’ चित्रपट (यूके, फ्रान्स, ग्रीस, २०२३)
६. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ओटीटी पुरस्कार – पंचायत सीझन २
७. विशेष ज्युरी पुरस्कार – ऋषभ शेट्टी, दिग्दर्शक (कांतारा चित्रपट)

चित्रपट उद्योगासाठी गोवा हे प्रमुख केंद्र बनण्यासाठी सरकार कटीबद्ध ! – मुख्यमंत्री

पणजी : गोवा राज्य चित्रपट उद्योगासाठीचे केंद्र बनण्यासाठी विनाअडचणी परवाने, आवश्यक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन आदी उपलब्ध करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी (शुटिंगसाठी) सर्व प्रकारचे सहकार्य करू. निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि आधुनिक वातावरण यांमुळे गोवा हे चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन आहे. महोत्सवात दाखवण्यात आलेल्या गोव्यातील चित्रपटांची समीक्षकांनी प्रशंसाही केली.’’

यंदा आंचिममध्ये जगभरातील ७ सहस्र प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच महोत्सवात ७८ देशांतील २७० चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.

‘हॉलिवूड चित्रपट निर्माते मायकल डग्लस यांनी त्यांचा पुढचा चित्रपट गोव्यात करावा’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.