पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे प्रदूषण करणार्या ६०४ जणांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई !
पिंपरी (जिल्हा पुणे) – राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या. नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून १३ दिवसांत ५३ लाख रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. वायूप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे पिंपरी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी महापालिकेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ८ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी २ याप्रमाणे १६ विशेष वायूप्रदूषण देखरेख पथके तैनात केली आहेत. उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक आदींचा पथकात समावेश आहे. प्रदूषण करणार्या संस्था, कारखाने, बांधकाम व्यावसायिक आदींवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. आस्थापनांना भेट देऊन छायाचित्रे काढण्यात येत आहेत. प्रसंगी चित्रीकरणही केले जात आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते, तसेच या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी ४ उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.