मराठवाड्यातील १०७ मंडळांत अवकाळी पावसामुळे १० सहस्र हेक्टरहून अधिक पिकांची हानी !
छत्रपती संभाजीनगर – दुष्काळाचे चटके सहन करणार्या मराठवाड्याला २६ आणि २७ नोव्हेंबर या दिवशी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. विशेषत: २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या पावसाने या विभागातील १० सहस्र हेक्टरहून अधिक पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषीतज्ञांनी व्यक्त केला आहे. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात ४ सहस्र हेक्टरहून अधिक हानी झाली आहे.
मराठवाड्यात यंदा २६ नोव्हेंबरच्या रात्री ते २७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत म्हणजे १२ घंट्यांत ४१.५ मिमी (२२७ टक्के अधिक) पाऊस पडला. १०७ मंडळात अतीवृष्टीही झाली. त्यामुळे कापूस, ज्वारी, मका, तूर, भाजीपाला यांची हानी झाली. रब्बीसाठी मात्र हा पाऊस लाभदायी ठरेल. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसला आहे.
वीज पडून पशूधनाची हानी झाली आहे. सहस्रो हेक्टरवरील भातपीकही उद्ध्वस्त झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात २६ मंडळांत अतीवृष्टी होऊन ३३ सहस्र ६५१ हेक्टर शेतीची हानी झाली आहे. वीज पडून ८१ बकर्या आणि १ म्हैस, तसेच १ बैल दगावला. अकोला जिल्ह्यात ३२.६ मिमी पाऊस झाला. काही भागांत गारपीट होऊन कापूस भिजला. तूर, कांदा, हरभरा या पिकांचीही हानी झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये द्राक्ष, कांदा, डाळिंब, फळे-भाजीपाला यांची हानी झाली आहे.