नाशिक येथे धर्मांतरासाठी आमीष दाखवणार्या ६ ख्रिस्ती मिशनर्यांविरुद्ध गुन्हा नोंद !
नाशिक – येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पैशाचे आमीष दाखवून एका ख्रिस्ती मिशनरी महिलेसह तिच्या साथीदारांनी मोलमजुरी करणारा तरुण मोहन राधाकिसन म्हस्के याला धर्मांतर करण्याविषयी बळजोरी केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (ख्रिस्ती मिशनरी पैसे आणि विविध वस्तू यांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत असल्याने पोलिसांनी अशांवर कारवाई करावी, तसेच हिंदूंनी ख्रिस्ती मिशनर्यांपासून सावध राहिले पाहिजे. – संपादक)
याविषयी मोहन म्हस्के यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता अंबड येथील घरकुल योजनेच्या इमारतीखाली मी बसलो असतांना तेथे एका ख्रिस्ती महिलेने धर्मांतर करण्यासाठी मला पैशाचे आमीष दाखवले. तिच्यासह ५ साथीदारांनी मला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास बळजोरी करत माझ्या धार्मिक श्रद्धेचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
या तक्रारीवरून देवीदास जगत पंडोले, आकाश गजानन कांबळे, गुरुदेव सुभाष मोरे यांसह ३ महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. धर्मांतर करण्याविषयीची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. अंबड एम्.आय.डी.सी. पोलीस चौकीत भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंद करण्याची विनंती पोलिसांना केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
संपादकीय भूमिका :हिंदूंनो, ख्रिस्ती मिशनर्यांच्या भूलथापांना बळी पडू नका ! |