‘स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान महाराष्ट्र’ आयोजित ‘भव्य किल्ले महोत्सव २०२३’चा पारितोषिक वितरण समारंभ !
‘पन्हाळा-पावनखिंड’ साकारल्याविषयी घणसोली येथील ‘आदेश्वर बॉईज’ यांचा प्रथम क्रमांक
मुंबई, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान महाराष्ट्र’ आयोजित ‘भव्य किल्ले महोत्सव २०२३’ पर्व सातवे स्पर्धेत आदेश्वर बॉईज, घणसोली यांनी साकारलेल्या ‘पन्हाळा-पावनखिंड’साठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सर्वदूर पोचावे, तसेच गडदुर्गांच्या संवर्धनासाठी तरुण उद्युक्त व्हावेत, या उदात्त हेतूने ‘स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून ‘स्वराज्य किल्ले दारोदारी’ या संकल्पनेतूनच किल्ले महोत्सव स्पर्धा गत ७ वर्षांपासून आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत यंदा मुंबई आणि उपनगरातील ७५ हौशी गडप्रेमी स्पर्धक सहभागी झाले होते.
२६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी करीरोड येथे या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. न्यू हिंद मिल म्हाडा संकुल, पोरबंदर, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद खोत, पदाधिकारी श्री. सिद्धार्थ सावंत, श्री. कौशल पाटील, श्री. स्वप्नील साळुंखे, श्री. संतोष भोसले, श्री. मंगेश भोसले आणि सौ. स्नेहल धुरी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या वेळी शिवकालीन प्रश्नमंजुषा, शाहीर सुनील चूडनाईक यांचा ‘चमके शिवबाची तलवार’, तसेच पोवाडा आणि शिव व्याख्याते रूपेश पवार यांचे समालोचन झाले. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. दुर्गसांगातींच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.