सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय !

सातारा, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा शहरातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी शहरात आठवड्यातील एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार कास तलाव या माध्यमातून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी, तर शहापूर पाणवठा माध्यमातून आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी पाणीकपात करण्यात येणार आहे. हा निर्णय याच आठवड्यापासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

ते म्हणाले की, शहापूर आणि कास जल योजनांच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. धरण परिसरात पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प झाल्यामुळे उरमोडी धरणातील पाणीसाठाही तुलनेत अल्प आहे. धरणातील आवर्तनांवर परिणाम होणार आहे. कृष्णा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी नगरपालिकेला कळवले आहे. धरणातील आवर्तनांच्या अभावी शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कास आणि शहापूर जल योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणार्‍या सातारावासियांनी पाणीकपातीला सहकार्य करावे.