रोहित, तुझे चुकले नाही, चूक वर्ष ७१२ ची !
भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत हरला, या पार्श्वभूमीवर विचारप्रवण करणारा लेख !
सलग १० सामने अत्यंत सहजपणे तुझा (भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा यांचा) संघ जिंकला. तुझ्या संघात महंमद सिराज आणि महंमद शमी असे २ मुसलमान असले, तरी तेही सर्वांप्रमाणेच त्वेषाने लढले अथवा सर्वांप्रमाणेच लढले नाहीत. त्यांना आम्ही या ठिकाणी तरी अहिंदू मानत नाही. ११ वा अंतिम सामना मात्र तुम्ही त्याच सहजतेने हरलात, ज्या सहजतेने पहिले १० सामने जिंकले होते. ज्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात तुम्हाला पराभूत केले, त्या ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप नंतरच्या पहिल्याच २० षटकांच्या सामन्यात तुम्ही सहजपणे हरवले. याच ऑस्ट्रेलियाला तुम्ही साखळी सामन्यातही सहजतेने हरवले होते. ‘जागतिक स्तरावरचे खेळाडू संघात असतांना आम्ही अंतिम सामनाच हरतो’, याची बोच कोट्यवधी हिंदूंना तथा भारतियांना लागलीच असेल. अशी बोच फार काळ हृदयात सलत ठेवणे त्यांना जमत नाही. त्यांना तसे कुणी शिकवलेले नाही.
म्हणून म्हणतो ही चूक तुमचीच नाही. या चुकीचे किंवा निर्णायक क्षणी हार मानण्याचे बाळकडूच आम्हाला वर्ष ७१२ पासून मिळाले असेल, तर त्यात तुमचा काय दोष ? हृदयात कसलीच टोचणी कित्येक पिढ्या आम्हाला लागतच नसेल, तर तुम्हाला तरी दोषी का धरावे ?
१. भारतीय निर्णायक क्षणी हरण्याचे न विसरता येणारे क्षण !
अ. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये वर्ष १९४७ मध्ये भारताने काश्मीर निर्णायकपणे कह्यात घेतले. लढाई जिंकत आल्यावर हा प्रश्न आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे नाहक नेला. या वेळी युद्ध जिंकूनही निर्णायक क्षणी आम्ही हरलो; मात्र त्याची सल आम्हाला वाटत नाही. पाकव्याप्त काश्मीर जगभरात भारतापासून वेगळा दाखवला जातो. त्याचेही आम्हाला काही वाटत नाही.
आ. वर्ष १९६५ मध्ये कच्छच्या रणातील संघर्षापासून पाकिस्तानसमवेतचे युद्ध आपण जिंकलो; पण युद्धानंतर झालेल्या तह ताश्कंद करारात हरलो. यामध्ये आमचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आम्ही गमावले. या वेळीही निर्णायक क्षणी आम्ही हरलो. याचीही सल आम्हाला वाटत नाही.
इ. वर्ष १९७१ मध्येही आपण बांगलादेश स्वतंत्र करून दिला; पण तेथील हिंदूंच्या समस्या सोडवल्या नाहीत. बांगलादेशी घुसखोरांचा विषय तसाच ठेवला. रोहित, तुम्ही अंतिम सामना हरल्यावर त्याच बांगलादेशात आंनदोत्सव साजरा झाला.
ई. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी स्वत:चे रक्त सांडले, कित्येक क्रांतीकारक फासावर गेले. इंग्रजांना स्वातंत्र्य देणे भागच होते; पण आम्ही पाकिस्तान वेगळा दिला. धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे पडले असतांनाही आमचा भाग आम्ही ‘धर्मनिरपेक्ष’ केला. हे जोखड आम्हीच आमच्यावर लादून घेतले. पुन्हा निर्णायक क्षणी आम्ही हरलो.
२. रोहित, तुला एकट्याला दोषी का धरावे ?
या सगळ्यांची सल आम्हाला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘सद्गुण विकृतीचा दोष आमच्यात आहे का ?’ आणि तो तुमच्याही उतरला आहे का ? याचा अभ्यास करायला पाहिजे; पण हा अभ्यास करणार कोण ?
या देशात गझनीच्या महंमदापासून बाबर, अकबर, औरंगजेबापर्यंत अनेकांनी आक्रमणे केली, बळजोरीने हिंदूंना बाटवले. हे बाटलेले हिंदू कदाचित् पुन्हा हिंदु धर्मात आलेही असते, त्यासाठी ते आसूसलेही असतीलही; पण आम्ही जिंकल्यानंतर त्यांना पुन्हा आमच्यात सामावून घेतले नाही. त्यांना आम्ही तोडून टाकले. आमच्यापासून वेगळे लेखले. याचाच परिणाम कि काय ? अर्वाचीन काळात एका बाजूला अफगाणिस्तान आणि दुसर्या बाजूला कंबोडिया इतक्या लांबपर्यंत विस्तारलेला हिंदु धर्म आज भारतातही राजधर्म नाही. ‘येत्या ५०-१०० वर्षांत भारतातही हिंदू अल्पसंख्य होतील कि काय ?’, ही भीती आम्हाला आहे. तसे झाल्यास आम्हाला जायला अन्य कोणताच देश नाही. ‘हिमालयात जाणे किंवा समुद्रात बुडून मरणे, एवढेच आमच्या हातात राहील’, हेही आम्हाला कळत नाही. गतानुगतीकांची अगतिकता आमच्यात पुरेपूर सामावली आहे. मग रोहित, तुला एकट्याला दोषी का धरावे ?
३. ‘बचेंगे तो और भी लढेंगे ।’, आम्हाला हे शिकवलेच गेले नाही, याचा हा परिणाम !
बरे रोहित, तू पडलास खेळाडू ! ‘ऑस्ट्रेलियाच्याच कर्णधाराला, म्हणजे पॅट कमिन्स यालाच त्यांच्या संघातून फोडून भारतीय संघाचा कर्णधार करणे आणि स्वत: उपकर्णधार होणे’, या पद्धतीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करणे तुला सुचलेच नसेल. अर्थात् सामने असे जिंकले जातच नसतात. याचा प्रत्यय आम्ही अन्य ठिकाणीही घेऊ; पण सध्या त्याला अवकाश आहे.
वर्षानुवर्षे आम्ही अकबर आणि बिरबल यांच्या कथा ऐकतो. आम्हाला त्याचाही राग येत नाही. समाजवादी सानेगुरुजी ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे’ असे लिहितात. आम्ही शाळेमध्ये ते गाणे मनापासून गातो; पण हे प्रेषित कोण ? आणि हे राष्ट्र त्यांचे कसे ? हा प्रश्न आम्हाला पडत नाही.
माझ्यापुरते विचारशील, तर रोहित, तू छत्रपती संभाजी महाराजांना अभ्यासायला पाहिजे. मृत्यू समोर दिसत असतांनाही धर्मांतराला कदापि सिद्ध न होणार्या त्या बलीदानामुळे औरंगजेबाचे स्वप्न कायमचे ठिकर्या ठिकर्या होऊन पडले. सेनापती किंवा राजा समोर नसलेला सेनासागर ‘आम्ही हरणार’, हे गृहित धरून त्या महाकाय मोगलांशी लढत राहिला आणि शेवटी याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब टाचा घासत मेला. तू दत्ताजी शिंदे यांना अभ्यासायला पाहिजे. पानिपतमधील रणभूमीवर मृत्यू समोर दिसत असतांना दत्ताजींना अबदालीने कुत्सितपणे विचारले, ‘‘क्यो दत्ताजी लडेंगे ?’’ यावर मातीत कोसळलेला, अंगभर वेदनांचा आगडोंब सहन करणारा तो योद्धा त्वेषाने उत्तरला ‘बचेंगे तो और भी लढेंगे ।’ आम्हाला हे शिकवले गेले नाही आणि तुलाही ते शिकवले नसेल. गांधीजींची ३ माकडे बघणार्यांना ‘और भी लढेंगे’चा त्वेष काय समजणार ? बाकी आणि काय लिहू ?
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (२६.११.२०२३)