उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांची १७ दिवसांनंतर यशस्वी सुटका !
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सिल्कियारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी उशिरा टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात आले. दुपारी शेष राहिलेले १० मीटर अंतर ‘रॅट मायनर्स’च्या पथकाने हाती खोदकाम करत पूर्ण केल्यानंतर तेथे ३ फूट रुंदीचे पाईप घालण्यात आले. त्यानंतर या पाईपमधून चाके लावलेल्या स्ट्रेचरवर कामगारांना झोपवून दोरीने खेचून एकेक करत बाहेर काढण्यात आले. पाईपच्या आत सर्वांच्या संरक्षणासाठी ऑक्सिजन मास्क, डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष चष्मा आणि हवेसाठी स्वेटर देण्यात आले होते.
कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथकाचे सैनिक काम करत होते. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ रुग्णवाहिकेतून चिन्यालिसौर रुग्णालयात तपासणी करता नेण्यात आले. बोगद्याच्या वरून करण्यात येणारे खोदकाम यामुळे थांबवण्यात आले. येथून ४४ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले होते.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी २७ नोव्हेंबरच्या सायंकाळी देशवासियांना केले होते.
रॅट मायनर्स काय आहेत?अरुंद मार्गिकेमधून ड्रिल करणार्या कामगारांना ‘रॅट मायनर्स’ म्हणजे ‘उंदीर खाण कामगार’ म्हणतात. अशा प्रकारे खोदकाम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, कौशल्य आणि भरपूर सराव आवश्यक असतो. या रॅट मायनर्सने ८०० मि.मी. पाईपमध्ये प्रवेश करून खोदकाम केले. |