रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती वसुधा देशपांडे (वय ७० वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. राष्ट्रीय भावसत्संगात ‘ॐ’चा ब्रह्मनाद कसा असतो ?’, असे सांगितल्यावर साधिकेने तसा प्रयत्न केल्यावर ‘ॐ’ चा ब्रह्मनाद अनुभवायला मिळणे
‘२३.९.२०२१ या दिवशीच्या भावसत्संगात ‘ॐ’चा ब्रह्मनाद कसा असतो ?’, हे सांगितले. त्यामुळे मलाही वाटले, ‘आपणही तसे करून बघूया.’ ‘ॐ’चा ब्रह्मनाद करत असतांना माझ्या विशुद्धचक्रातून खाली स्वाधिष्ठानचक्राकडे जाणारा ‘ॐ’चा नाद आतून खोल आला. तंबोर्याची तार छेडल्यासारखा आवाज येऊन खालून वर सहस्रारकडे गेला. साधारण ५ – ६ वेळा ‘ॐ’ म्हटल्यावर मेंदूला गोलाकार संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर पुन्हा तो आवाज खाली आला आणि अनाहतचक्रात एखाद्या गोल घुमटात फिरल्यासारखा झाला’, असे १२ वेळा झाल्यावर त्या आवाजाशी एकरूप होऊन चारही दिशांतून मोठ्याने ‘ॐ’ ऐकू येऊ लागला. नंतर ‘तो आवाज किती वेळ चालू होता ?’, याचे मला भान राहिले नाही. डोळे उघडून पाहिल्यावर ‘३० मिनिटे तो आवाज चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. यालाच ‘ॐ चा ब्रह्मनाद’ म्हणतात आणि हा अंतर्मुखतेचा असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. नामजप करू लागल्यानंतर तंबोर्याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येणे आणि कंप होणे
साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो. संपूर्ण शरिरावर गुदगुल्या केल्यासारखे होते आणि पायाच्या संवेदना पुष्कळ वेळ टिकून रहातात. त्या वेळी माझ्या शरिरातील ३४ स्थानांमधून मला नामजप ऐकू येत होता. ‘तो नामजप कोण म्हणते ?’, हे पहाण्यासाठी मी डोळे उघडून पाहिले, तर तेथे कुणीच नव्हते; म्हणून मी परत नामजप करू लागले. त्या वेळी पुन्हा ३ – ४ ठिकाणांतून मला नामजप ऐकू येऊ लागला. मी जरी नामजप बंद केला, तरी तो आतून चालू होता.
३. रात्री झोपतांना नामजपासह श्वास चालू असल्याचे आणि अंगावरची चादरही श्वास घेत असल्याचे अनुभवणे
मी रात्री झोपतांना नामजप करत झोपते. ‘जेव्हा माझा नामजपासह श्वास चालू असतो, तेव्हा माझ्या अंगावरची चादरही श्वास घेते’, असे मी २ वर्षांपासून अनुभवत आहे. एकदा मी सहज माझ्या चादरीला म्हणाले, ‘तू आता श्वास घेणे पुरे कर. तुझ्यामुळे माझा नामजप होत नाही आणि माझे केवळ तुझ्याकडेच लक्ष जाते.’ तेव्हा त्या चादरीने श्वास घेणे एकदम थांबवले. त्या वेळी मला असे वाटले, ‘तिला कदाचित् माझे बोलणे समजले असेल.’ नंतर मला पुष्कळ खंत वाटली. ती प्रेमाने माझ्यासह असूनही मी तिला असे बोलले; म्हणून मी तिची क्षमा मागितली. तेव्हा ती चटकन हसली आणि पुन्हा नामजपासह श्वासानुरूप हलू लागली.
४. ‘मंत्रपठणाला आवश्यक असलेल्या साधक संख्येत न्यून असलेली संख्या भगवंत पूर्ण करतो’, याची साधिकेने घेतलेली अनुभूती
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रामरक्षा मंत्रपठण केले जाते. त्या वेळी मंत्रपठणाला ८ साधकांची आवश्यकता असते. मंत्रपठण करतांना मला ‘आमच्या आवाजाच्या समवेत कोपर्यातून रामरक्षा म्हणण्यार्या पुरुषांचा लयबद्ध आवाज येतो.’ एकदा माझ्या मनात आले, ‘हा पुरुषाचा आवाज कोणाचा आहे ?, ते बघावे.’ तेव्हा मला तिथे २ ऋषी मांडी घालून रामरक्षा म्हणत असतांना दिसले. त्या वेळी आम्हा साधकांच्या अपेक्षित संख्येत नेमके २ साधक न्यून होते. २५.९.२०२१ या दिवशी मंत्रपठण करतांना १ साधक न्यून होता. तेव्हा एकच ऋषि रामरक्षा म्हणत होते. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘मंत्रपठणाला जेवढे साधक न्यून असतील, तेवढ्यांची संख्या भगवंत पूर्ण करतो’, या विचाराने मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्या मनाची हुरहुर न्यून झाली.
‘हे गुरुदेवा, अशा सर्व अनुभूती देऊन माझे मन आनंदी ठेवता. ‘सर्व देवच करतो’, याची प्रचीती मला अखंड देत असता. त्यासाठी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती वसुधा कालिदास देशपांडे (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२१)
श्रीमती वसुधा कालिदास देशपांडे यांना आलेल्या अनुभूती कल्पनेच्या पलीकडील आहेत. तशा आतापर्यंत कुठे वाचनातही आलेल्या नाहीत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! त्यांना आलेल्या अनुभूती ‘त्यांची साधनेत किती प्रगती झाली आहे’, हे दर्शवतात. त्यांची साधनेत पुढेही अशीच प्रगती होत राहील, एवढेच मी सांगू इच्छितो !
– परात्पर गुरु डॉ. आठवले (२८.४.२०२३) |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |