जगभरात युवा पिढीत शाकाहार करण्याच्या प्रमाणात वृद्धी ! – अमेरिकी संशोधन

गोमांस आणि मांसाहार उद्योग आरोग्यासह पर्यावरणालाही हानीकारक ठरत असल्याने शाकाहारात वाढ !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत प्रतिदिन गोमांसाचे भक्षण करणार्‍या एकूण लोकांपैकी १२ टक्के लोक तब्बल ५० टक्के गोमांस खातात. हे १२ टक्के लोक म्हणजेच ५० ते ६५ वर्षे वयोगटातील लोक आहेत. दुसरीकडे अमेरिकेसमवेत जगभरात युवा पिढीचा कल आता शाकाहाराकडेच असल्याचे समोर आले आहे. हे चांगले संकेत आहेत. याचे कारण असे की, गोमांस आणि मांसाहार उद्योग हा आरोग्यासमवेतच पर्यावरणाला हानीकारक असल्याचे सिद्ध होत आहे.

जगभरात तरुणवर्गाचा शाकाहाराकडे वाढता कल !

‘जर्नल न्यूट्रिएंट्स’ या नियतकालिकात प्रकाशित एका अभ्यासात ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन’ या अमेरिकी संस्थेच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणाच्या आकड्यांचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यामध्ये वरील निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

१. या सर्वेक्षणानुसार २९ वर्षांपेक्षा अल्प आणि ६६ वर्षे वयापेक्षा अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाल्याचे समोर आले. यातून हवामान पालटासाठी उत्तरदायी असलेल्या गोमांसाला प्रामुख्याने तरुण वर्ग हातभार लावत नसल्याचे निष्पन्न झाले.

२. या अभ्यासासाठी १० सहस्रांहून अधिक लोकांच्या आहारावर लक्ष ठेवण्यात आले होते.

३. या अभ्यासासनुसार धोकादायक ‘ग्रीनहाऊस वायू उत्सर्जना’साठी गोमांस उद्योग सर्वाधिक उत्तरदायी आहे. कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो. जगभरात प्रतिवर्षी खाद्यपदार्थांचा उद्योग १७ अब्ज टन ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन करतो.

४. शोधकर्त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार नानाप्रकारच्या जनावरांचे मांस खाण्यात चीन कुख्यात राहिला आहे. असे असले, तरी मांसाच्या या व्यवसायाच्या संदर्भात चीनही गेल्या काही वर्षांत सतर्क होऊ लागला आहे. स्वास्थ्याप्रती जागरूक होणारे चिनी युवक शाकाहारी भोजन स्वीकारत आहेत. केवळ शांघाय शहराचा विचार केला असता, वर्ष २०१२ मध्ये तेथे केवळ २९ शाकाहारी रेस्टॉरंट होते. वर्ष २०२१ मध्ये ती संख्या १५० च्या वर गेली आहे.