ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
मंदिर सरकारीकरण, मंदिरांवरील आघात, मंदिरात वस्रसंहिता लागू करण्यासह विविध विषयांवर होणार चर्चा !
पुणे – मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यातून मिळणार्या ईश्वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षित होतो. त्यामुळे मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे, हे हिंदु समाजाचे दायित्व आहे. मंदिरातील देवतातत्त्व टिकवण्यासाठी मंदिरांत विधीवत् पूजा-अर्चा करणे, प्राचीन मंदिर-संस्कृतीचे संवर्धन करणे, मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणार्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्
वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ आणि ३ डिसेंबर २०२३ या दिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला ग्रामदैवत कसबा गणपतीच्या विश्वस्त श्रीमती संगिताताई ठकार, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, श्री पुणे जिल्हा जैन महासंघाचे सचिव श्री. रमेश ओसवाल, करमाळा येथील श्री दत्त मंदिरचे विश्वस्त आणि अधिवक्ता दत्तात्रय देवळे, भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त श्री. मधुकर रामकृष्ण गवांदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले हे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातून २०० हून अधिक विश्वस्त उपस्थित रहाणार !
या वेळी श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ ४ मासांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात केवळ ६ मासांत २६२ मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात या परिषदेसाठी मंदिर विश्वस्तांच्या भेटी चालू असून २०० हून अधिक विश्वस्त पुणे जिल्ह्यातून उपस्थित रहाणार आहेत.
परिषदेला उपस्थित मान्यवरांचे मनोगत
१. ओझर येथे होणार्या परिषदेस अधिकाधिक विश्वस्तांनी उपस्थित रहावे ! – मधुकर गवांदे, विश्वस्त, भीमाशंकर देवस्थान
जळगाव येथील मंदिर परिषदेला अनेक मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. मंदिरांच्या परंपरांचे रक्षण करणे, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, मंदिरांत वस्रसंहिता लागू करणे, अशा अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा होऊन कृतीशील कार्य करण्यासाठी या वेळी प्रयत्न करण्यात आले. त्या संघटित प्रयत्नांना यशही मिळाले आहे. यातीलच पुढील टप्पा म्हणून ओझर येथे होणार्या परिषदेस अधिकाधिक विश्वस्तांनी उपस्थित रहावे.
२. संपूर्ण जैन समाजाला मंदिर महासंघाच्या या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ! – रमेश ओसवाल, सचिव, पुणे जिल्हा जैन महासंघ
या परिषदेच्या निमित्ताने होणारे मंदिर विश्वस्तांचे संघटन अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘वक्फ’ कायद्यामुळे ज्या मंदिरांचे अधिग्रहण झालेे आहे, त्याविषयीही आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’ कायदा, तसेच वक्फ बोर्डाला कोणतीही मालमत्ता ‘वक्फची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा देण्यात आलेला अधिकार कसा चुकीचा आहे, याविषयीही चर्चा करणे आवश्यक आहे. ‘गोरक्षणासाठी गोशाळा चालू करून मंदिरांचा हिंदु समाजाला कसा लाभ होईल ?’, याविषयी विचार होणे आवश्यक आहे. जैन समाज किंवा जैन धर्म हा हिंदु धर्मापासून फारसा वेगळा आहे, असे मी समजत नाही. त्यामुळे मी संपूर्ण जैन समाजातील मंदिर विश्वस्तांना या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
अधिवेशनाला उपस्थित मान्यवर
या परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, ‘झी’ २४ तास या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. नीलेश खरे यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, तसेच देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आदी मंदिरांचे विश्वस्त, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
पुढील विषयांवर होणार चर्चा
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे. |