Indian Navy Day 2023 : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन
मालवण : येथे साजरा होणारा नौसेना दिन आणि त्यासाठी येणार्या अतीमहनीय व्यक्ती या अनुषंगाने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत शहर, तसेच अतीमहनीय व्यक्ती ये-जा करणारे रस्ते आणि परिसर येथील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणार्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मालवण पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी मालवणवासियांना केलेल्या सूचना
१. ४ डिसेंबर या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात यावीत.
२. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत स्वतःच्या दुकानांसमोरील रस्त्यावर दुचाकी, सायकल यांसारखी वाहने उभी करू नयेत. स्वतःच्या दुकानाच्या परिसरात वाहनतळाची सुविधा असल्यास रस्त्यापासून ६० फूट आतमध्ये स्वत:ची वाहने उभी करावीत.
३. वाहनतळ सुविधा उपलब्ध नसल्यास रॉक गार्डन, नगरपालिकेचे वाहनतळ, तारकर्ली नाका, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, दांडी बीच, ‘मोरयाचा धोंडा’ या ठिकाणी निश्चित केलेल्या ठिकाणी स्वत:ची वाहने उभी करावीत.
४. ४ डिसेंबर या दिवशी अतिशय महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त आस्थापने किंवा दुकाने यांतून बाहेर येऊ नये. बोर्डिंग मैदान ते देऊळवाडा या रस्त्यावर दुपारी २ ते ४ या वेळेत, तर देऊळवाडा ते तारकर्ली या रस्त्यावर दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत कुणीही अतीमहत्त्वाच्या कामाविना ये-जा करू नये.
५. स्वतःच्या दुकानांच्या परिसरात किंवा रस्त्यालगत स्वतःच्या मालकीच्या भूमीतील झाडांच्या फांद्या, झावळे, रस्त्यावर आल्या असल्यास त्या छाटण्याची कार्यवाही स्वस्तरावर करण्यात यावी.
६. शहरातील मुख्य रस्त्यांवर बैल, म्हैस, गाय, कुत्रा, मांजरे, कोंबडी यांसारखी जनावरे येऊ नयेत, यासाठी सावधानता संबंधित नागरिकांनी बाळगायची आहे.
७. १ डिसेंबरपूर्वी स्वत: हॉटेल, दुकाने, आस्थापने या ठिकाणी लावलेले बॅनर्स, होर्डिंग, बोर्ड, पोस्टर्स आदी विज्ञापनांसाठी लावलेले साहित्य काढून ठेवण्यात यावेत.
८. एखाद्या हॉटेलमध्ये, दुकानात, आस्थापन या ठिकाणी किंवा परिसरात एखादी अनोळखी व्यक्ती आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात द्यावी.