निरपेक्ष, अनासक्त आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असणारे चिराला (जिल्हा प्रकाशम्, आंध्रप्रदेश) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्रीबदरी नारायण आरवल्ली (वय ५२ वर्षे) !
१. ईश्वरावरील दृढ श्रद्धा
१ अ. देवावरील श्रद्धेच्या बळावर वडिलांचे आज्ञापालन करून आध्यात्मिक मार्ग स्वीकारणे आणि मनापासून साधना करणे : ‘माझे मामा श्रीबदरी नारायण आरवल्ली (वय ५२ वर्षे) पूर्वी नोकरी करत होते. माझे आजोबा (आईचे वडील (कै.) रंगनायकाचार्युलू आरवल्ली) वैष्णव संप्रदायानुसार साधना करून त्याच संप्रदायाचा प्रसार करत होते. आजोबांनी माझ्या मामांना नोकरी सोडून साधना करण्यास सांगितले. तेव्हा मामांचे वय साधारण २५ वर्षे होते. त्या वेळी त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना ६ मासांची मुलगीही होती. नोकरी हेच आर्थिक उत्पन्नाचे साधन होते. ‘पुढे कुटुंबही चालवावे लागणार’, हे ठाऊक असूनही मामांनी केवळ ईश्वरावर श्रद्धा ठेवून वडिलांचे आज्ञापालन केले आणि आध्यात्मिक मार्ग स्वीकारून मनापासून साधना केली.
१ आ. ईश्वरावरील श्रद्धेमुळे आयुष्यातील कठीण प्रसंगांना धिराने तोंड देणे : आध्यात्मिक प्रसार करत असतांना मामांनी मध्येच भूमी खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू केला होता. त्या व्यवसायात त्यांच्या भागीदाराने त्यांची फसवणूक केली. त्या वेळी मामांची मोठी आर्थिक हानी झाली. त्यामुळे त्यांना पुष्कळ कर्ज झाले होते. नोटाबंदीमुळे त्यांनी बांधलेल्या सदनिकांची विक्री झाली नव्हती. त्या वेळी मामांकडे पैशांचा दुसरा कोणताही स्रोत नव्हता. त्या कालावधीत त्यांची मनःस्थिती थोडी बिघडली होती. त्या वेळी ते केवळ ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्या स्थितीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःला सावरले. ‘माझा ईश्वरावर विश्वास आहे. तोच सर्वकाही सावरू शकतो’, असे म्हणून ते सर्व समस्यांना सामोरे जात होते.
२. मितभाषी
मामा आवश्यक तेवढेच बोलतात आणि आम्हालाही सांगतात, ‘‘अल्प बोला आणि काम अधिक करा.’’
३. निरपेक्षता
नातेवाईक त्यांच्याशी बोलो अथवा न बोलो; मामा त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत.
४. तत्त्वनिष्ठता
घरात पत्नी असो किंवा त्यांच्या घरी येणारे वैष्णव संप्रदायांचे अनुयायी असोत, त्यांची कोणतीही चूक मामांच्या लक्षात आली, तर मामा त्वरित त्यांना चूक सांगतात आणि त्यावर योग्य दृष्टीकोन देतात.
५. मामांना करणीमुळे होत असलेले विविध त्रास दूर होण्यासाठी विधी करणार्या एका व्यक्तीने मामांची फसवणूक करणे आणि मामांनी स्वतः मंत्रजप केल्यावर त्यांचे त्रास न्यून होणे
काही वर्षांपूर्वी कुणीतरी मामांवर करणी केली होती. त्यांच्या घराच्या दाराजवळ करणीशी संबंधित वस्तू, उदा. हाडे, लिंबू इत्यादी सापडत होते. त्याच्या प्रभावामुळे मामांचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक त्रास पुष्कळच वाढले होते. जादूटोण्याचा प्रभाव दूर करण्यासाठी एका व्यक्तीने त्यांना काही विधी करायला सांगितले होते. ती व्यक्ती स्वतःच घरी येऊन विधी करत होती; परंतु तिने फसवणूक करून मामांचा त्रास आणखी वाढवला. त्या वेळी मामांनी स्वतः मंत्रजप करण्यास आरंभ केला. काही मासांनंतर त्यांचे त्रास न्यून होऊ लागले.
६. ‘राग येणे’ या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करणे
काही वर्षांपूर्वी त्यांना पुष्कळ राग येत असे; परंतु आता त्यांना राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. जेव्हा स्वतःतील स्वभावदोष त्यांच्या लक्षात येतात, तेव्हा ते त्यांवर चिंतन करतात. रागावर मात करण्यासाठी ते मौन पाळण्याचा, तसेच दुसर्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
७. साधनेतील सातत्य आणि चिकाटी
मामा घरात शास्त्रानुसार प्रतिदिन २ वेळा पूजा करतात आणि त्यात कधीच खंड पडत नाही. त्यांना दुसर्या गावी जावे लागले, तर ते देवाच्या मूर्ती समवेत घेऊन जातात आणि पूजा करतात. ते कर्मकांडातील सर्व नियमांचे कठोरतेने पालन करतात. ते प्रतिदिन मंत्रजप करतात. एकदा मामा आमच्या घरी भाग्यनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा मामांनी नातेवाइकांशी अधिक वेळ बोलत न बसता दुसर्या खोलीत जाऊन त्यांचे नित्याचे मंत्रजप पूर्ण केले.
८. जोपर्यंत देवपूजा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते अन्न ग्रहण करत नाहीत. प्रतिदिन पूजा पूर्ण होण्यास त्यांना दुपारचा एक वाजतो. त्यानंतर ते भोजन करतात.
९. व्यापकता
मामांच्या घरी प्रतिदिन वैष्णव संप्रदायाची विशेष पूजा असते आणि त्या पूजेचा लाभ घेण्यासाठी अनेक भक्तगण येतात. भक्तांनी अर्पणात दिलेल्या पैशांवरच मामांचे घर चालते; परंतु अत्यल्प भक्तगण पैसे अर्पण करतात. ‘अर्पण देणार्यांनाच प्रसाद द्यावा’, असा संकुचित विचार मामांच्या मनात नसतो. मामा सर्वांनाच भरभरून प्रसाद देतात.
१०. मामांनी जीवनात पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास भोगले आहेत. काही लोक त्यांना अपशब्द बोलले आणि त्यांनी मामांचा अपमानही केला; परंतु मामा कुणाचीही निंदा करत नाहीत.
११. क्षमाशीलता
मामांना पुष्कळ लोकांनी फसवले आहे; परंतु मामांच्या मनात त्यांच्याप्रती मुळीच द्वेषभावना नाही. त्यांना फसवणार्यांपैकी कुणाशी त्यांची भेट झाली, तर मामा त्यांच्याशी सहजतेने बोलतात.
१२. अनासक्त
आजोबांची काही संपत्ती मामांना मिळणार होती; परंतु आजोबांच्या काही नातेवाइकांनी पुष्कळ भांडण केले. त्यामुळे त्रस्त होऊन मामांनी ती संपत्तीच सोडून दिली. आताही मामांना संपत्ती, वस्तू किंवा पैसे यांविषयी मोह किंवा आसक्ती नाही.
१३. आई-वडिलांप्रती आदरभाव
अ. मामांचे वडील (माझे आजोबा) ४ – ५ मास अंथरुणाला खिळून होते. तेव्हा मामांनी त्यांची मनापासून सेवा केली.
आ. आजोबा गेल्यानंतर ते माझी आजी पू. (श्रीमती) आंडाळ आरवल्ली (वय ८७ वर्षे) हिचीही सेवा मनापासून करत आहेत.
इ. मामा नेहमी घरातून बाहेर जातांना आजीचा आशीर्वाद घेतात आणि कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी आजीला सर्वकाही विचारतात.
ई. मामांकडे स्वतःची शेतभूमी आहे. ती भूमी विकली असती, तर त्यांना त्या पैशाने सगळे कर्ज चुकते करता आले असते; परंतु त्यांच्या आईने ती भूमी विकायला नकार दिला; म्हणून त्यांनी आतापर्यंत ती भूमी विकली नाही आणि त्याविषयी कधीही आईकडे तक्रार केली नाही.
उ. आपल्या जीवनात किंवा कुटुंबात काही चांगले घडले, तर त्याचे श्रेय मामा आपल्या आई-वडिलांनाच देतात. मामांच्या या आदरभावामुळे त्यांची मुलेही आजोबा आणि आजी यांच्याकडे आदराने पहातात.
१४. सनातन संस्थेविषयी मनात आदर असणे
ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत नाहीत; परंतु त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि साधना यांविषयी पुष्कळ आदर आहे.
१५. घरात झालेले आध्यात्मिक पालट
अ. मामा प्रतिदिन घरात वैष्णव संप्रदायानुसार भावपूर्ण पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या घरातील चैतन्य वाढले आहे. तिरुपति वेंकटेश्वर स्वामीच्या मंदिरात जसा चंदन आणि तुळस यांचा सुगंध येतो, तसाच सुगंध त्यांच्या देवघरातही येतो. त्यांच्या देवघरात बसून नामजप केल्यावर मन पुष्कळ एकाग्र होते आणि शीतलता अनुभवता येते.
आ. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात एक गाय येऊन पुष्कळ वेळ बसली होती.
इ. मामांच्या अंगावर दैवी कणही दिसतात.’
– सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी वेंकटापुर (श्रीबदरी नारायण आरवल्ली यांची भाची, बहिणीची मुलगी), भाग्यनगर, तेलंगाणा. (८.९.२०२३)
|