अंतरवाली सराटी येथील हिंसाचारात सहभागी ४३ जणांचा शोध चालू !
३०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे नोंद !
जालना – अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे. यानंतर वडीगोद्री, अंतरवाली सराटी, धुळे महामार्गावर हिंसाचार करणार्या अजून ४३ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
अंतरवाली सराटी येथील हिंसाचारातील मुख्य संशयित असलेला ऋषिकेश बेदरे याच्या कह्यातील पिस्तूलमधून किती गोळ्या झाडल्या ? कधीपासून त्याच्याकडे पिस्तूल आहे ? हे पिस्तूल कोणत्या वर्षाचे आहे ? याचे अन्वेषण करण्यासाठी ते पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जात आहे. याचा अहवाल १५ दिवसांमध्ये येणार आहे.
अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. यानंतर संपूर्ण जिल्ह्यातच जागोजागी जाळपोळ आणि तोडफोड चालू झाली होती. वडीगोद्रीजवळ अनेक शासकीय बसगाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ होऊन एस्.टी. महामंडळाची लाखो रुपयांची हानी झाली होती. या प्रकरणी अन्वेषणाचे काम चालू आहे, असे गोंदी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.