रामायण-महाभारतातील कूटनीतीचा वापर परराष्ट्र धोरणात हवा ! – डॉ. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
पुणे येथील ‘भारताची धोरणात्मक संस्कृती’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन !
पुणे – सध्या जगात चीन आणि अमेरिका येथे ‘पॉवर पॉलिटिक्स’ची स्पर्धा चालू आहे. अशा वेळी त्यांना शह देण्यासाठी आपण रामायण-महाभारतातील कूटनीतीचा वापर परराष्ट्र धोरणात का करू नये ?, तसेच या पूर्वीच्या राजकारण्यांनी राबवलेल्या अलिप्ततावाद भूमिकेने विशेष काही साध्य झाले नाही, असे मत परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी पुणे येथे एका चर्चासत्राचे उद्घाटन करतांना व्यक्त केले. येथील सिम्बायोसिस विद्यापिठाच्या वतीने ‘भारताची धोरणात्मक संस्कृती’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन डॉ. जयशंकर यांनी केले. या वेळी व्यासपिठावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापिठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार, कुलगुरु डॉ. रामकृष्ण रमण, प्रकुलगुरु डॉ. विद्या येरवाडकर यांची उपस्थिती होती.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, एकेकाळी भारत जगातील अतीप्रगत आणि प्रचंड शक्तिमान राष्ट्र होते. रामायण, महाभारत काळ हे त्याचे उदाहरण आहे. श्रीराम, श्रीकृष्ण, श्री हनुमान यांपासून कौटिल्य ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंतच्या महापुरुषांनी आपल्याला मुत्सद्दी परराष्ट्र धोरणाचे धडे दिले. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, तसेच त्याचा उपयोग परराष्ट्र धोरणात केला पाहिजे. आपल्या देशात श्रीकृष्ण आणि हनुमान हे परराष्ट्र धोरण राबवणारे उत्तम मुत्सद्दी होऊन गेले.
ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीची ओळख पुसून टाकण्याचेच काम केले !
ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीची ओळख पुसून टाकण्याचेच काम केले. आपल्यावर ग्रीक संस्कृतीसह अनेक संस्कृतीचे आघात झाले; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीची खरी ओळख पुन्हा एकदा ताकदीने करून दिली, ती स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. भारतातील राजे-महाराजे यांनीही आपली संस्कृती जपली. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राजांचे मोठे योगदान असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
संपादकीय भूमिकामहापुरुषांनी दिलेल्या मुत्सद्दी परराष्ट्र धोरणांतून बोध घेऊन त्याविषयी अभिमान बाळगूया ! |