त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ५१ सहस्र दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट !
कोल्हापूर – त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचगंगा नदीच्या घाटावर २७ नोव्हेंबरला पहाटे दीपोत्सव साजरा करण्यात आला. नदीघाट परिसरात शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने ५१ सहस्र दिवे प्रज्वलीत करण्यात आले. पहाटे हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप देसाई यांच्या हस्ते आरती करून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी २६ नोव्हेंबरला सायंकाळी पंचगंगा नदीकाठावर आरती करण्यात आली. या प्रसंगी गेली अनेक वर्षे निष्ठेने पंचगंगेची आरती करणारे भाविक श्री. स्वप्नील मुळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. यानंतर सहस्रो भाविकांनी पंचगंगा नदीकाठावर दीप प्रज्वलीत केले.
पौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुलास आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली होती. शहरात जवळपास प्रत्येक मंदिरात स्थानिक भाविकांनी दीपोत्सव साजरा केला. पंचगंगा नदीकाठावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कोल्हापूरकर रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत पंचगंगा नदीकाठावर उपस्थित होते. नदीकाठावर भाविकांसाठी प्रसाद वाटपही करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनेही टेंबलाईवाडी-विक्रमनगर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध धारकरी, मान्यवर उपस्थित होते.