पुढच्या २६/११ ची सिद्धता…?
प्रतिवर्षी २६/११ ला (२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईतील ताज हॉटेलवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाची आठवण) आम्ही सामाजिक माध्यमे, प्रिंट (छापील) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध्यांना श्रद्धांजली वहाणार, मेणबत्त्या पेटवणार, ‘पुन्हा असे होणार नाही’, अशी खुळचट समजूत घालत रहाणार आणि तेच ते नि तेच ते…!! या सगळ्या झाकोळातून २८/११ ला आपल्या कमांडोजनी आतंकवाद्यांना पकडले तो शौर्यदिन मात्र विसरणार…!! यातून नेमके काय साध्य होणार…? एक जागरूक नागरिक म्हणून आपण संशयास्पद व्यक्ती वा वस्तू यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला तरी देतो का ? याचा विचार होणे आवश्यक आहे. आजही घुसखोरी होत आहे. आपण कमी दरात बांगलादेशी कामगार मिळतात; म्हणून त्यांच्याकडून फर्निचर, रंगरंगोटी आदी अनेक कामे करून घेतोच. त्या वेळी सुरक्षेचा विचार तरी मनात येतो का…? आपल्या शेजारी काय चालले आहे ? याचा आपल्याला पत्ता नसतो आणि आपण ‘२६/११ पुन्हा होणे नाही’, अशी भाषणे ऐकतो.
त्या घटनेनंतर ‘सरकार तरी किती जागे आहे ?’, त्याचा जाब जेव्हा न्यायालयाने विचारला, त्यावर उत्तर नव्हते. मग आपण छातीठोकपणे ‘पुन्हा असे आतंकवादी आक्रमण होणारच नाही’, अशी वल्गना करणे, म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे नाही का ? अद्याप सागरी सुरक्षेविषयी बेफिकिरी दिसून येते. तेव्हा खरेदी केलेल्या २३ बोटींपैकी केवळ आठच चालू आहेत. ‘किनारपट्टीवर २४ घंटे गस्त घालणे असंभव आहे’, असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे वृत्त २६ नोव्हेंबर या दिवशी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले आहे. पोलिसांच्या २ सहस्र ३०६ संमत पदांपैकी ६८२ जागाच भरल्या असल्या, तर असेच होणार. ‘देश सुरक्षित राहू दे. किमान आपली गल्ली, प्रभाग आणि गाव यांची सुरक्षा तरी पहाण्याइतके आपण जागरूक असतो का ?’, हा विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या नशिबात मेणबत्त्या लावणेच असेल; कारण मशाली धरण्यासाठी आमचे हात बनलेलेच नाहीत ना…!!
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२६.११.२०२३) (साभार : फेसबुक)