दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून चोरी !; गृहरक्षकाकडून मारहाण; एकाचा मृत्यू !..
मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून चोरी !
डोंबिवली – येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ चोरांनी घरात एकट्या असलेल्या मुलीचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. घरातून रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे उदाहरण !
गृहरक्षकाकडून मारहाण; एकाचा मृत्यू !
नागपूर – कार्तिक पौर्णिमेनिमित्त रामटेक गड मंदिरातून परततांना २ युवकांना होमगार्ड (गृहरक्षक) आणि त्याचे साथीदार यांनी पुष्कळ मारहाण केली आणि ऑनलाईन १० सहस्र रुपये लुटले. या मारहाणीत विवेक खोब्रागडे या युवकाचा मृत्यू झाला. मनीष भारती असे आरोपीचे नाव आहे.
वाढती हिंसकता रोखायला हवी !
३५ सहस्र कंत्राटी डॉक्टरांच्या संपाला ३२ दिवस उलटले !
मुंबई – आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणार्या ३५ सहस्र कंत्राटी डॉक्टर-कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या ३२ व्या दिवशीही संपाविषयी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संपकरी कर्मचार्यांनी १२ डिसेंबर या दिवशी नागपूर अधिवेशनाच्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. संपामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
संप करून रुग्णांना वेठीस न धरता सनदशीर मार्गाने आंदोलन करा !
पुणे विमानतळावरून परदेशी जाणार्या गुन्हेगारास अटक !
पुणे – अधिक परताव्याचे आमीष दाखवून आभासी चलनामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतवणूकदारांची दीड कोटी रुपयांची फसवणूक केलेले गुन्हेगार पवनकुमार तत्ववेदी आणि पंकज तत्ववेदी यांना ‘सायबर सेल’च्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विमानतळावरून अटक केली. ते परदेशी जात होते. आरोपीकडून भ्रमणभाष, डेबिट कार्ड, परदेशी चलन जप्त केले आहे. दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा साखर कारखाना उसासाठी ३ सहस्र ३०० रुपये दर देणार !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याने उसासाठी ३ सहस्र ३०० रुपये दर घोषित केला आहे, अशी माहिती अध्यक्ष पी.एम्. पाटील यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २३ नोव्हेंबरला ३ सहस्र ५०० रुपये दर मिळावा, यासाठी आंदोलन केले होते. यानंतर काही कारखान्यांनी ३ सहस्र २०० रुपयांचा दर घोषित केला होता.