उत्तरप्रदेशात बंदीवान सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे करत आहेत पठण !
सरकारकडून प्रत्येक बंदीवानाला अशा प्रकारचे धर्मग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार !
आझमगड (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील कारागृहात असणारे बंदीवान रामायणातील सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे पठण करू लागले आहेत, अशी माहिती राज्याचे कारागृहमंत्री धर्मवीर प्रजापती यांनी दिली. यासाठी त्यांनी राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना अधिक ग्रंथ उपलब्ध करण्यासह अन्य सुविधा पुरवण्याचा आदेश दिला आहे. ‘या संदर्भात कोणत्याही बंदीवानाला पठणासाठी बाध्य केले जाणार नाही’, असेही प्रजापती यांनी स्पष्ट केले. येथील कारागृहात जाऊन त्यांनी बंदीवानांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सौजन्य झी न्यूज
१. मंत्री धर्मवीर प्रजापती म्हणाले की, बंदीवानांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये सुधारणा होण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. यात कोणताही धार्मिक उद्देश नाही आणि अनिवार्यताही नाही. व्यक्तीमत्त्व विकासासाठी श्री हनुमानापेक्षा अधिक चांगला गुरु असू शकत नाही. यामुळेच बंदीवानांना हनुमान चालिसाचे पठण करण्यास सांगितले जात आहे. त्याद्वारे ते कारागृहातून सुटल्यानंतर समाजात जाऊन चांगले जीवन जगण्याचे शिकतील. त्यासाठी आम्ही त्यांना हनुमान चालिसा उपलब्ध करून देत आहोत.
२. मंत्री धर्मवीर प्रजापती यांनी सांगितले, ‘मी यापूर्वी अनेक कारागृहात जाऊन आलो आहे. मथुरा आणि आगरा येथील कारागृहांमध्ये हनुमान चालिसा वितरित करण्यात आल्या आहेत, तसेच तेथे सामूहिक पठणही करण्यात आले आहे. यानंतर तेथे बंदीवानांमध्ये पठणासाठी गर्दी होऊ लागली. ही स्थिती आझमगडच्या कारागृहातही पहाण्यात आली. यामुळेच येथे कुणी धार्मिक ग्रंथांची मागणी केली, तर त्याला लगेच ते उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी ग्रंथालयात ग्रंथ ठेवण्यात येतील. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये अशी व्यवस्था केली जात आहे.’
३. काही मुसलमान बंदीवानही हिंदूंचे धर्मग्रंथ वाचत आहेत. अशा प्रकारे अनेक बंदीवान अन्य धर्मांचे ग्रंथ वाचत आहे, अशी माहितीही मंत्री प्रजापती यांनी दिली. (हिंदु बंदीवानांनी अन्य धर्मियांची पुस्तके वाचल्यावर त्याचे धर्मांतर करण्याचा कुणी प्रयत्न करू नये, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असे देशातील प्रत्येक कारागृहात केले पाहिजेत. तसेच बंदीवानांना हिंदु धर्माचे शिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करण्यास सांगितले पाहिजे. याद्वारे त्यांच्या मनोवृत्तीत पालट होऊन ते सुसंस्कृत बनतील ! |