World Hindu Congress: सनातन धर्माचा द्वेष करणार्यांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्याचा संकल्प !
|
बँकॉक (थायलंड) – हिंदु संघटनांमध्ये एकता निर्माण करणे आणि सनातन धर्माचा द्वेष करणार्यांचा अधिक प्रभावीपणे सामना करणे, असा संकल्प करून येथे आयोजित ३ दिवसांच्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चा समारोप करण्यात आला. या परिषदेला ६१ देशांचे २ सहस्र १०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुढील परिषद वर्ष २०२६ मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी आयोजकांकडून करण्यात आली.
हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन !या परिषदेच्या शेवटी सहभागी झालेल्या प्रत्येकाला लाडूचा डबा वाटण्यात आला. या डब्यावर ‘दुर्दैवाने हिंदु समाज एका नरम लाडूसारखा दिसत आहे आणि त्याला सहजपणे तोडून खाता येईल. एक मोठा आणि कडक लाडू भक्कम असतो. याचे तुकडे करता येत नाहीत. हिंदूंना एक मोठ्या कडक लाडूप्रमाणे बनायला हवे ज्याला कुणी तोडणे कठीण असेल आणि शत्रूच्या शक्तीच्या विरोधात स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम असेल’, असे लिहिण्यात आले होते. |