Consumer Protection : गोवा : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा आस्थापनाची आव्हान याचिका फेटाळली

  • वेलसाव येथे शॅकला लागलेल्या आगीचे प्रकरण

  • आयोगाच्या म्हणण्यानुसार विमा उतरवलेल्या मालमत्तेविषयी नंतर तक्रार करून शकत नाही

फोंडा, २६ नोव्हेंबर (वार्ता.) : वेलसाव (दक्षिण गोवा) येथील एका शॅकला लागलेल्या आगीच्या प्रकरणी हानीभरपाई देण्यासंबंधी गोवा राज्य आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी बजाज अलायन्स या विमा आस्थापनाची याचिका राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फेटाळली आहे.

१५.५.२०१२ या दिवशी वेलसाव येथे उपाहारगृह असलेल्या एका शॅकला आग लागली होती आणि यासंबंधी विम्याची रक्कम मिळावी, असा दावा या शॅकचे मालक भूपेंद्रर गेहेलोत यांनी बजाज अलायन्स विमा आस्थापनाकडे केला होता. ‘मालमत्तेच्या वर्गवारीमध्ये सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून आस्थापनाने शॅकच्या मालकाला विम्याची रक्कम नाकारली होती. यानंतर शॅकचे मालक भूपेंद्रर गेहेलोत यांनी गोवा राज्य आयोगाकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. या प्रकरणी गोवा राज्य आयोगाने या आस्थापनाला शॅकच्या मालकाला विम्याची १७ लाख ६३ सहस्र २६५ रुपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला होता, तसेच हानीभरपाई म्हणून ५० सहस्र रुपये आणि कायदेशीर सोपस्कार करण्याचा खर्च म्हणून १० सहस्र रुपये द्यावेत, असे म्हटले होते. या आदेशाने समाधान न झाल्याने बजाज अलायन्स आस्थापनाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे आव्हान याचिका प्रविष्ट केली होती.

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने यावर निर्णय देतांना बजाज अलायन्स या आस्थापनाचे विमा न देण्यासंबंधीचे कारण अयोग्य ठरवून याचिका फेटाळली आहे. आयोगाचे म्हणणे आहे
की, आस्थापनाने आधीच शॅकचा विमा उतरवला असल्याने ‘शॅक पूर्णपणे जळून गेल्यानंतर नंतरच्या अवस्थेत ते उपाहारगृह नसून तात्पुरता बांधलेला शॅक होता’, असे आस्थापनाला म्हणता येणार नाही.