दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वृद्धाची फसवणूक !; विनापरवाना भेसळयुक्त दारूची विक्री !…
वृद्धाची फसवणूक !
नाशिक – येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक करणार्या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. या चोरट्यांनी वृद्धाकडून ३ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, भ्रमणभाष, तीन टपाल कार्यालयांचे पासबुक, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रोख १३ सहस्र रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.
विनापरवाना भेसळयुक्त दारूची विक्री !
नांदेड – येथे काही ठिकाणी ताडीविक्रीच्या नावाखाली रसायनमिश्रित शिंदी आणि विनापरवाना भेसळयुक्त दारूची उघडपणे विक्री होत आहे. रसायन मिश्रित शिंदी आरोग्यास अपायकारक असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. ‘जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागप्रमुख यांनी भेसळयुक्त विनापरवाना शिंदी आणि दारू यांच्यावर बंदी घालावी’, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे लक्ष द्यावे !
तरुणीशी अश्लील वर्तन !
पुणे – स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्या तरुणीशी अश्लील वर्तन करणार्या खासगी शिक्षण संस्थेतील प्राध्यापकावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अमित सिरमनवर (वय २८ वर्षे) असे त्याचे नाव आहे. त्याने तरुणीला छडीने मारून घरातील कामेही करण्यास सांगितली.
अशा वासनांधांना कठोर शिक्षाच हवी !
पुढील तीन दिवस अवेळी पाऊस !
मुंबई – भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांत अवेळी पावसाची चेतावणी दिली आहे. यात उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकर्यांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मनसेने चिनी ऑटोमोबाईलच्या शोरूमला काळे फासले
ठाणे, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील एम्.जी. या चिनी ऑटोमोबाईल आस्थापनाच्या शोरूमला मनसेच्या पदाधिकार्यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी काळे फासून आंदोलन केले. मराठीत पाटी नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. ‘मराठीत पाट्या लावा, अन्यथा मनसेच्या ‘खळखट्याक्’ आंदोलनाला सामोरे जा’, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि पदाधिकारी यांनी दुकानदारांना दिली आहे.