‘गतीमान’ भगवान वायु
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५८
१. वायूविना जीवन अशक्य
वारा (वायु) आहे, म्हणून तर जीवन शक्य आहे. ‘केवळ ५ मिनिटे आपण वायूविना राहूया’, असे म्हटले, तर ते शक्य होईल का ? श्वास न घेता किती वेळ राहता येते पहा ! वायूविना जीवनाची कल्पनाही करता येत नाही. असा हा वायू विश्वाचा आधार आहे. साक्षात् भगवान आहे. वारा एका जागी स्थिर कधीच नसतो. तो ‘गतीमान’ असतो. ‘जीवनाला ‘गती’ देणे’ हे त्याचे मुख्य काम आहे.
२. जिथे जिथे ‘गती’ तिथे तिथे ‘वात’
बाह्य सृष्टीतील वारा किंवा वायु, म्हणजेच आपल्यामधील ‘वात’. हा भगवंतच आहे. याच्याविना आपले जीवन अशक्य आहे. श्वासोच्छ्वास, हृदयाची धडधड, रक्ताचे वहाणे, अन्नाचे वहन (अन्न आत घेतल्यापासून मलरूपाने बाहेर पडेपर्यंतचा प्रवास), हातापायांची हालचाल, डोळ्यांची उघडझाप, मनाची प्रसन्नता, उत्साह… ही सूची कितीही लांब करता येऊ शकते. थोडक्यात जिथे जिथे ‘गती’ तिथे तिथे ‘वात’ !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan