उतारवयातही शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून अन् तळमळीने सेवा करणारे कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अनंत विठ्ठल मुळ्ये (वय ७५ वर्षे) !
३.७.२०२३ या दिवशी कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. अनंत विठ्ठल मुळ्ये (वय ७५ वर्षे) यांचे अपघातामध्ये निधन झाले. २७.११.२०२३ या दिवशी त्यांचे चौथे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री. रोहन मुळ्ये यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि श्री. अनंत मुळ्ये यांना निधनापूर्वी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. धार्मिक वृत्ती
अ. ‘माझे वडील (कै. अनंत मुळ्ये) अतिशय धार्मिक होते. ‘पहाटे लवकर उठून देवपूजा करून नामस्मरण करणे’, हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यात कधीही खंड पडला नाही. ते नियमितपणे स्वतः बाजारात जाऊन देवासाठी फुले आणून देवासाठी हार बनवायचे.
आ. मृत्यूपूर्वी २ मास त्यांनी गुरुवारचा उपवास करण्यास प्रारंभ केला होता. त्या दिवशी ते केवळ एक वेळचे जेवण घ्यायचे.
२. इतरांना साहाय्य करणे
बाबा ‘भारतीय टांकसाळ’ येथे ‘क्रेन ऑपरेटर’ म्हणून नोकरी करत होते. नोकरीत असतांना ते कामगार संघटनेचे नेते (युनियन लिडर) होते. बाबांचे सहकारी बाबांकडे त्यांच्या अडचणी घेऊन यायचे आणि बाबा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करायचे.
३. सेवेची तळमळ
अ. वर्ष २००० पासून बाबांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केली. त्यांनी अध्यात्मप्रसार करणे, अर्पण आणि विज्ञापने घेणे, नियतकालिक ‘सनातन प्रभात’, सनातन पंचांग अन् ग्रंथ यांचे वितरण करणे इत्यादी सेवा भावपूर्ण आणि तळमळीने केल्या.
आ. वर्ष २०१७ मध्ये ते काही दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि देहली सेवाकेंद्र येथे सेवेसाठी गेले होते. ते अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी हरिद्वार येथेही १ मास गेले होते.
इ. उतारवय असूनही ते झोकून देऊन सेवा करायचे.
ई. वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांनी स्वागतकक्षाच्या नियोजनाची सेवा, गुरुपौर्णिमेच्या प्रसादकक्षाची सिद्धता इत्यादी सेवा केल्या.
या सेवा करून दुचाकीने ते घरी परतत असतांना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. गुरुकृपेने शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा नियमित चालू होती.
४. सनातन संस्थेविषयी असलेली आपुलकी !
माझे बाबा सनातन संस्थेला आपले कुटुंबच मानायचे. त्यामुळे साधकांविषयी त्यांना विशेष आपुलकी वाटायची. त्यांना ‘साधकांचे शारीरिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक त्रास न्यून व्हावेत’, असे पुष्कळ वाटायचे. तसे ते बोलूनही दाखवत असत.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
अ. ‘प्रत्येक साधक हे श्री गुरूंचे रूप आहे’, असा त्यांचा भाव होता.
आ. बाबांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा होती. बाबा त्यांना श्रीकृष्णाच्या रूपात पहात असत. त्यामुळे ते साधना आणि सेवा तळमळीने करत असत.
६. निधनापूर्वी वडिलांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
६ अ. वडिलांच्या मृत्यूपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन धाकट्या मुलाविषयी वडिलांना आश्वस्त करणे : बाबांना माझ्या लहान भावाविषयी (श्री. प्रसाद मुळ्ये) काळजी वाटायची. सर्वसामान्यांच्या तुलनेत त्याची आकलनक्षमता अल्प आहे. त्यामुळे ‘तो सत्सेवेत रहावा’, यासाठी ते त्याला सतत प्रोत्साहन द्यायचे. बाबांच्या मृत्यूच्या २ आठवड्यांपूर्वी बाबांच्या स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले आणि ते बाबांना म्हणाले, ‘‘तुम्ही त्याची (लहान मुलगा श्री. प्रसाद मुळ्ये याची) काही काळजी करू नका. त्याचे प्रारब्धभोग संपल्यावर तो सर्वसामान्य व्यक्तीसारखा वागू लागेल. पुढे त्याचे सर्वकाही व्यवस्थित होणार आहे. तुम्ही तुमच्या साधनेकडे लक्ष द्या.’’
६ आ. वडिलांच्या मृत्यूच्या १ दिवस आधी वडिलांना त्यांचा लिंगदेह सप्तलोकात फिरून आल्याचे जाणवणे : मृत्यूपूर्वी २ दिवस माझे बाबा अस्वस्थ होते. या २ दिवसांत त्यांना झोप लागली नव्हती. मृत्यूच्या १ दिवस आधी त्यांना विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना ‘त्यांचा लिंगदेह त्यांच्या शरिरातून बाहेर पडून सप्तलोकात फिरून आला आणि त्याने पुन्हा त्यांच्या शरिरात प्रवेश केला’, असे दिसले आणि जाणवले.
श्री गुरुकृपेने आम्ही सर्व कुटुंबीय (आई (श्रीमती अंजली मुळ्ये) आणि आम्ही तिन्ही भावंडे (मी, मधला भाऊ चेतन आणि धाकटा भाऊ प्रसाद) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहोत. गुरुचरणी कृतज्ञता !’
– श्री. रोहन मुळ्ये, डोंबिवली (जिल्हा ठाणे) (२३.११.२०२३)
तळमळीने सेवा करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कै. अनंत विठ्ठल मुळ्ये !१. सौ. प्राजक्ता सावंत १ अ. सनातन निर्मित देवतांच्या चित्रांची देवघरात मांडणी करून प्रतिदिन भावपूर्ण आरती करणे : ‘मी साधनेत आल्यानंतर माझी पहिली ओळख मुळ्येकाकांशी झाली. त्या वेळी मी भांडुप (मुंबई) येथे रहात होते. काका अधूनमधून सेवेच्या निमित्ताने आमच्या घरी येत असत. मीसुद्धा त्यांच्या घरी जात असे. त्यांच्या घरी त्यांनी सनातननिर्मित देवतांच्या चित्रांची मांडणी केली होती. ते नियमितपणे सकाळी भावपूर्ण आरती करत असत. त्यांनी देवघरात केलेली आरास पाहून माझाही भाव जागृत व्हायचा. त्या वेळी मी नुकताच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला होता. माझ्यासाठी सर्वकाही नवीन होते; पण ‘देवतांप्रती भाव कसा असावा ?’, हे मला त्यांच्या कृतीतून शिकायला मिळाले. १ आ. झोकून देऊन तळमळीने सेवा करणे : काका विज्ञापनाची सेवा कुशलतेने करायचे. त्यांना सेवेची पुष्कळ तळमळ होती. ते सेवेविना कधी स्वस्थ बसत नसत. गुरुपौर्णिमा जवळ आल्यावर त्यांची सेवेची गती पुष्कळ वाढत असे. ते झोकून देऊन सेवा करायचे. वर्ष २०२२ मध्ये मी मुंबई येथून कणकवलीला स्थलांतरित झाले. काही दिवसांनी मुळ्येकाकांनीही कणकवलीला घर घेतले. इकडे आल्यानंतर ते साधकांसह विज्ञापनांची सेवा करायचे. वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेला त्यांनी प्रसाद कक्षाचे दायित्व घेतले होते. १ इ. उत्साही आणि आनंदी असणे : वयोमानानुसार त्यांचा पूर्वीचा सेवेचा उत्साह जराही न्यून झाला नव्हता. ते सतत आनंदी असायचे आणि सेवेला नेहमीच प्राधान्य द्यायचे.’ २. सौ. भारती सावंत २ अ. ‘काका केंद्रातील सत्संग किंवा कार्यक्रम यांना वेळेत उपस्थित रहात असत. २ आ. परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास असणे : वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये काकांकडे गुरुपौर्णिमेच्या प्रसादाचे दायित्व होते. प्रसादाच्या सेवेविषयी काही सूचना माझ्याकडे होत्या. त्या काकांना कळेपर्यंत ते माझा पाठपुरावा करत होते. यातून त्यांचा सेवा परिपूर्ण करण्याचा ध्यास मला शिकता आला. २ इ. इतरांचा विचार करून सेवेचे योग्य नियोजन करणे : या वर्षी प्रसादाची पाकिटे माझ्याकडे होती. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आम्ही सभागृहात सेवा करत असतांना काका मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही उद्या व्यस्त असणार ना ! माझ्याकडे आताच पाकिटे देऊन ठेवा. मी उद्या प्रसाद आणतांना पाकिटे समवेत घेऊन येईन.’’ यातून त्यांची इतरांचा विचार करण्याची वृत्ती माझ्या लक्षात आली. २ ई. गुरूंप्रती भाव : गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्याप्रती काकांचा प्रचंड भाव होता. काकांना ‘सद्गुरु सत्यवान कदम केंद्रात येणार’, असे समजल्यावर ते म्हणायचे, ‘‘माझी गुरुमाऊली येणार आहे.’’ (सर्व सूत्रांचा दिनांक : १.८.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |