भाव, भक्ती आणि श्रद्धा यांद्वारे निरंतर ईश्वरभक्ती करणार्या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सुमन चव्हाण (वय ७० वर्षे) जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
अकलूज (जिल्हा सोलापूर), २६ नोव्हेंबर (वार्ता.) – भाव, भक्ती आणि श्रद्धा यांद्वारे निरंतर ईश्वरभक्ती करणार्या सौ. सुमन शिवाजी चव्हाण (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिली. १७ नोव्हेंबर या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात त्यांनी ही वार्ता दिली. या वेळी सौ. सुमन चव्हाण यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सौ. सुमन चव्हाण यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला. सौ. सुमन चव्हाण यांची जळगाव येथे रहाणारी मुलगी सौ. मीना जाधव यांनाही दूरभाष करून ही आनंदवार्ता देण्यात आली. सौ. सुमन चव्हाण यांच्यासह सर्वच कुटुंबियांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत मनोगत मांडले.
माझी प्रार्थना आज पूर्ण झाल्यासारखे वाटते ! – सौ. सुमन चव्हाण
मी परात्पर गुरु डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) प्रार्थना करत होते की, ‘मला तुमच्या चरणांशी यायचे आहे. माझा श्वास चालू असेपर्यंत मला सतत नामजप करायचा आहे. रात्रंदिवस माझ्या हृदयात तुमचा वास असावा.’ ती प्रार्थना आज पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. नामजप करतांना गुरुदेवांची कान पकडून क्षमा मागत होते. गुरुदेवांनी आज ही आनंदवार्ता देऊन मला पुष्कळ आनंद दिला त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
कुटुंबियांचे मनोगत
साधनेतील अडचणी आई त्वरित विचारून घेत होती ! – मीना जाधव (सौ. सुमन चव्हाण यांची मुलगी)
आनंदवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला. आईमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट झाले आहेत. आईला तिच्या साधनेचा ध्यास होता. साधनेतील अडचणी ती त्वरित विचारून घेत होती.
श्री. समाधान चव्हाण (सौ. सुमन चव्हाण यांचा मुलगा)
आई प्रत्येक सत्संगाला वेळेत जोडते. तिच्या तोंडवळ्यामध्ये पुष्कळ सकारात्मक पालट झाला आहे. तिची आनंदावस्था सतत टिकून असते.
श्री. रणजित चव्हाण (सौ. सुमन चव्हाण यांचा मुलगा)
आई साधना तळमळीने करते. समोरची व्यक्ती चुकली, तरी ती तिला त्वरित क्षमा करते. नामजप करतांना आलेल्या अनुभूती ती आम्हाला आनंदाने सांगते.
सौ. सुमन चव्हाण यांची सौ. मीना विलास जाधव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. उत्साही
‘आईला अनेक वर्षांपासून थकवा आणि अशक्तपणा असतो. त्यामुळे ती काठी घेऊन आणि भिंतीला धरून चालते, तरीही ‘तिचा उत्साह तरुणांना लाजवेल’, असा असतो.
२. शिकण्याची वृत्ती
आधी तिला भ्रमणभाष हाताळता येत नव्हता. नंतर तिने ते शिकून घेतले. त्या वेळी ‘माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असे तिला वाटत होते.
३. सेवेची तळमळ
अ. ती सनातन संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी असते. ती धर्मदान अभियान, समाजात जाऊन राखी, भेटकार्ड आणि ग्रंथ यांची मागणी घेणे, सात्त्विक उत्पादने आणि ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके यांच्या वितरणासाठी प्रयत्न करणे, अशा सेवा तळमळीने करते.
आ. ती सर्वांना ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांचा नामजप करण्यास सांगते.
इ. आई कुटुंबातील प्रत्येक सदस्याला गुरुकार्यासाठी अर्पण करण्यास प्रवृत्त करते आणि तिच्या संपर्कात असलेल्या नातेवाइकांनाही अर्पण देण्यास सांगते.
४. अहं अल्प असणे
एकदा तिने मुलाला बाहेरून फळे आणायला सांगितली. तेव्हा तिच्या मनात ‘सूनबाई सगळे करते, तर तिलाच सांगायला हवे होते. तिला काय वाटेल ?’, असा विचार आला. तिला याची पुष्कळ खंत वाटत होती. तिने मला हे सांगितल्यावर मी तिला सुनेची क्षमा मागायला सांगितली. तेव्हा तिने सुनेची कान धरून क्षमा मागितली.
५. कठीण प्रसंगात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांभाळले’, अशी अनुभूती येणे
ती गावाला असतांना एकदा संध्याकाळी बाहेर फिरायला गेली होती. तेव्हा तिला चक्कर आली. तिने परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘गुरुदेव, येथे मला सांभाळायला जवळ कुणीच नाही. मला काही त्रास होणार असल्यास तो मी घरी गेल्यावर होऊ दे.’ त्यानंतर ती घरी पोचली आणि दारातच चक्कर येऊन पडली. ती जेथे पडली, तेथे जवळच एक मोठा दगड होता; पण ती त्या दगडावर न पडता ‘तिला अलगद कुणीतरी उचलून बाजूला ठेवले’, असे जाणवले. तिला जराही लागले नाही. तेव्हा तिला ‘गुरुदेवांनी मला अलगद उचलून बाजूला ठेवले आणि सांभाळले. मला आपल्या हाताने उचलून घेतले’, असे वाटून कृतज्ञता वाटत होती.
एकदा ती पलंगावरून खाली पडली. तेव्हा तिला काहीही लागले नाही. तेव्हाही तिला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटत होती.
६. सूक्ष्मातील कळणे
६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा सोहळा सूक्ष्मातून अनुभवणे : आईला वयोमानानुसार अल्प दिसते; पण तिला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण स्पष्ट दिसतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या वेळी आणि गुरुपौर्णिमेच्या वेळी तिला ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळाली होती; पण शारीरिक स्थिती ठीक नसल्याने तिला सत्संगाला जाता आले नाही. त्या वेळी तिने प्राप्त परिस्थिती स्वीकारून जन्मोत्सवाचा सोहळा सूक्ष्मातून अनुभवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या वेळी घडलेला प्रत्येक प्रसंग तिला पूर्ण दिसला होता. मी तिला ‘सोहळ्याचा वृत्तांत सांगितला. तेव्हा तिने सांगितले, ‘‘गुरुदेवांनी मला हे सगळे दृश्य सूक्ष्मातून दाखवले. मी आश्रमात जाऊन आले.’’ ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासाठी किती करतात ! मी एका खोलीत बसले आहे; पण भगवंत मला येथे सगळे दाखवत आहे.’’ यासाठी ती सतत कृतज्ञताभावात असते.
७. आईमध्ये झालेले पालट
अ. आईचा स्वभाव पूर्वी फार कडक आणि रागीट होता. आम्ही तिला सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडले. तेव्हापासून तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे.
आ. ती व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करते आणि तिच्याकडून झालेल्या चुका मला नियमितपणे सांगते, तसेच ‘अजून कसे प्रयत्न करू ?’, असेही विचारते.
इ. तिला कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. ती प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्यासाठी सतत प्रार्थना करते.
ई. ती सतत आनंदावस्थेत असते.
८. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची तीव्र इच्छा असणे
आईला रामनाथी येथे जाऊन गुरुदेवांना भेटण्याची फार इच्छा आहे. याआधी ३ वेळा आमचे तिला रामनाथीला घेऊन जाण्याचे ठरले; पण काही अडचणींमुळे ते रहित झाले. ‘एकदा रामनाथीला जाऊन आले की, मी मरायला मोकळी’, असे तिला वाटते.
‘गुरुदेव तुम्हीच आईला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन जावे आणि तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करावे’, अशी आपल्या चरणी संपूर्णपणे शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. मीना विलास जाधव (सौ. सुमन चव्हाण यांची मुलगी), पाचोरा, जिल्हा जळगाव. (१४.१०.२०२३)
|